ETV Bharat / bharat

तुर्कस्तानात भूकंप : मृतांची संख्या 24 वर, एक हजाराहून अधिक जखमी, बचावकार्य सुरू

author img

By

Published : Oct 31, 2020, 7:28 AM IST

Updated : Oct 31, 2020, 3:43 PM IST

तुर्कस्तानात झालेल्या भूकंपातील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. बचावकार्य सुरू असून मृतांची संख्या २४ पोहोचली आहे. तर १ हजारांपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहे. 7 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. या भूकंपानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

तुर्कस्तानात भूकंप
तुर्कस्तानात भूकंप

इस्तंबूल - युरोपातील ग्रीस आणि तुर्कस्तान देशांच्या मध्यभागी असलेल्या एजीएन समुद्रात काल (शुक्रवार) भूकंपाचे तीव्र धक्के बसले. त्यामुळे तुर्कस्तानाच्या पश्चिम भागातील अनेक इमारतील कोसळल्या. 7 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. या भूकंपानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक नागरिक हादरे बसू लागल्यानंतर घराबाहेर पळाल्याने बचावले.

तुर्कस्तानात भूकंप

24 जणांचा मृत्यू तर 1 हजारांपेक्षा जास्त जखमी

या भूकंपात आत्तापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला असून १ हजारांपेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भूकंपानंतर झालेल्या नुकसानीचे भीषण व्हिडिओ समोर आले आहेत. यात अनेक इमारती कोसळल्या असून काहींना तडे गेल्याचे दिसत आहे. संपूर्ण प्रांतात भूकंप झाल्यानंतर गोंधळ उडाला आहे. रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांनाही नुकसान पोहचले आहे. बचावकार्य सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

तुर्कस्तानात भूकंप
तुर्कस्तानात भूकंप

भूकंपाचे केंद्र समुद्रात

एजीएन समुद्रात १६.५ किमी खोल भूगर्भात भूकंपाचे केंद्र असून ७ रिश्टर स्केलचा भूकंप होता, त्यानंतर तुर्कस्तानातील इझ्मीर प्रांतात बचाव पथके पाठविण्यात आले आहे, असे तुर्कस्तानच्या आपत्ती निवारण पथकाने म्हटले आहे. भूमध्य समुद्र युरोपीयन भूगर्भशास्त्र केंद्राने ७ रिश्टर स्केलचा भूकंप असल्याचे सांगितले. भूकंपाचे केंद्र ग्रीस देशाच्या समोस बेटांपासून १३ किमी दूर असल्याचे केंद्राने स्पष्ट केले. तर अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने ७ रिश्टर स्केलचा भूकंप असल्याचा दावा केला आहे.

२० इमारती जमीनदोस्त

इझ्मीर शहराचे महापौर तुन्क सोयर यांनी माध्यमांशी बोलताना नुकसानीची माहिती दिली. सुमारे २० इमारती भूकंपाच्या धक्क्याने कोसळल्याचे ते म्हणाले. तुर्कस्तानातील इझ्मीर प्रांतात भूकंपामुळे नुकसान झाल्याचे व्हिडिओ स्थानिक माध्यमांनी दाखविले आहेत. यामध्ये बहुमजली इमारती जमीनदोस्त झाल्याचे दिसत आहे. इमारती कोसळल्याने परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत. इझ्मीर हे शहर तुर्कस्तानातील तीसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शहरात सुमारे ४५ लाख रहिवासी राहतात. इझ्मीर प्रांताबरोबर इतर सहा प्रांतातही इमारतींना तडे गेल्याचे गृहमंत्री म्हणाले.

ग्रीक देशातही जाणवले भूकंपाचे धक्के

राजधानी अथेन्ससह पूर्व ग्रीसच्या अनेक भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. ग्रीसमधील समोस बेटांवरील नागरिक भूकंपाच्या धक्क्यानंतर घरातून बाहेर पळाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

Last Updated :Oct 31, 2020, 3:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.