ETV Bharat / bharat

अरुणाचलमधून बेपत्ता झालेल्या 'त्या' पाच जणांना चीनने भारताकडे सोपवलं

author img

By

Published : Sep 12, 2020, 12:29 PM IST

Updated : Sep 12, 2020, 2:49 PM IST

अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील पाच जण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बेपत्ता झाले होते. हे पाचही जण टॅगिन समाजाचे असून ते शिकारीला गेले असताना, जंगलात वाट चुकल्याने चीनच्या हद्दीत गेले होते. चीनने आज त्यांना भारताकडे सोपवले.

किरण रिजिजू
किरण रिजिजू

इटानगर - अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील पाच जण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बेपत्ता झाले होते. ते पाचही जण चीनच्या ताब्यात असल्याची माहिती पीपल्स लिबरेशन आर्मीच्या अधिकाऱ्याने दिली. आज त्या पाचही जणांना चीनने भारताच्या ताब्यात दिले आहे. ही माहिती केंद्रीय युवा आणि क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी दिली.

बेपत्ता झालेले पाचही जण टॅगिन समाजाचे असून ते शिकारीला गेले असताना, जंगलात वाट चुकल्याने चीनच्या हद्दीत गेले होते. टोंक सिंगकम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू इबिया, तनु बेकर आणि नार्गु डिरी अशी त्यांची नावे आहेत. चीनच्या हद्दीत गेल्यानंतर चिनी सैन्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर पीएलएच्या अधिकाऱ्याने हॉटलाइनवर संपर्क साधत भारताला त्या पाच जणांविषयी माहिती दिली. आज त्यांना भारताकडे सोपवण्यात आले आहे. चुकून शेजारी देशात गेलेल्यांना मायदेशी आणण्यासाठी ज्या आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार प्रक्रिया होते, त्याच पद्धतीने ही प्रक्रिया झाली.

चीन आणि भारतादरम्यान गेल्या काही महिन्यांपासून सीमावाद सुरू आहे. 15 जूनला झालेल्या संघर्षात 20 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर भारताने कारवाई करत चीनच्या अनेक अ‌ॅपवर बंदी घातली आहे. सीमेवरील तणाव निवाळण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चेस प्राधान्य दिले होते. मात्र, चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच चीनने पुन्हा 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पूर्व लडाखमधील पँगाँग लेकच्या दक्षिण सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला.

देशाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर रशिया दौऱ्यावर असून त्यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. अखेर दोन तास चाललेल्या या बैठकीच्या शेवटी दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्र्यांचे पाच मुद्द्यांवर एकमत झाले. सीमा भागात शांतता, सुसंवाद आणि डिसएन्गेजमेंट राखण्याबाबत हे पाच मुद्दे दिशादर्शक ठरतील.

हेही वाचा - भारत-चीन सीमातणाव : सैनिक मागे हटवण्यावर दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांचे एकमत

Last Updated :Sep 12, 2020, 2:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.