ETV Bharat / bharat

Amritpal Singh News : पंजाब पोलिसांना चकमा देऊन पळाला अमृतपाल सिंह, फरार घोषित

author img

By

Published : Mar 19, 2023, 8:55 AM IST

पंजाब पोलिस खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह विरुद्ध अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी त्याच्या 'वारिस पंजाब दे' या संघटनेशी संबंधित लोकांविरुद्ध राज्यव्यापी कारवाई सुरू केली आहे. सध्या तो पोलिसांना चकमा देऊन पळाला असून पोलिसांची शोध मोहीम चालू आहे.

Amritpal Singh
अमृतपाल सिंह

चंदीगड : पंजाब सरकारने शनिवारी कट्टरपंथी धर्मोपदेशक आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह आणि त्याच्या समर्थकांविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आणि सिंह यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या 78 सदस्यांना अटक केली. दरम्यान, अमृतपाल सिंह याच्या ताफ्याला जालंधर जिल्ह्यात थांबवण्यात आले, मात्र तो पोलिसांना चकमा देऊन पळाला. अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी सुरक्षा कडक केली असून रविवार दुपारपर्यंत राज्यात इंटरनेट आणि एसएमएस सेवा निलंबित केली आहे.

आतापर्यंत 78 जणांना अटक : पोलिसांनी सांगितले की, त्यांनी सिंह याच्या नेतृत्वाखालील वारिस पंजाब दे (WPD) शी संबंधित लोकांविरुद्ध मोठी राज्यव्यापी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे. सिंह याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान आतापर्यंत एकूण 78 जणांना अटक करण्यात आली आहे, तर अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, अमृतपाल सिंह आणि इतर काही जण फरार असून त्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांची ही कारवाई अमृतपाल सिंह याची मुक्तसर जिल्ह्यातून 'खालसा वाहिर' या धार्मिक मिरवणुकीच्या एक दिवस आधी सुरु झाली. अमृतसरमधील जल्लूपूर खेडा या त्याच्या मूळ गावी सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वडिलांचा पोलिसांना सवाल : अमृतपालचे वडील तरसेम सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की, माझ्या मुलाला अटक झाली आहे की नाही, याची माहिती नाही. तरसेम यांनी सांगितले की, त्यांनी पोलिसांना सहकार्य केले आहे. मात्र त्यांनी पोलिसांची कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगून त्यांचा मुलगा तरुणांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे काम करत असल्याचे सांगितले. गुन्हेगार आणि अंमली पदार्थात गुंतलेल्यांवर पोलिस कारवाई का करत नाहीत, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

पोलिसांची राज्यव्यापी कारवाई : 'वारीस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल सिंह याच्या काही समर्थकांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की, पोलिस त्यांचा पाठलाग करत आहेत. एका व्हिडिओमध्ये अमृतपाल एका वाहनात बसलेलाही दिसतो आणि त्याचा एक सहकारी पोलीस अमृतपालच्या मागे असल्याचे सांगत असल्याचे ऐकू येते. पोलिसांच्या राज्यव्यापी कारवाईत आतापर्यंत एक 315 बोअर रायफल, सात 12 बोअर रायफल, एक रिव्हॉल्व्हर आणि 373 काडतुसे यासह नऊ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

पंजाब हाय अलर्टवर : पंजाबमध्ये अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले. एका पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, डब्ल्यूपीडीशी संबंधित लोक वेगवेगळ्या वर्गांमधील वैर वाढवणे, खुनाचा प्रयत्न करणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि सार्वजनिक सेवकांना त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणणे या चार गुन्हेगारी प्रकरणात गुंतलेले आहेत. ते म्हणाले की, 24 फेब्रुवारी रोजी अजनाळा पोलिस स्टेशनवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी डब्ल्यूपीडीच्या कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांवर हल्ला केला होता : गेल्या महिन्यात अमृतपाल आणि त्याच्या समर्थकांनी तलवारी आणि बंदुका घेऊन अमृतसर शहराच्या बाहेरील अजनाळा पोलिस स्टेशनमध्ये घुसले होते. हे सर्वजण अमृतपालच्या एका साथीदाराच्या सुटकेची मागणी करत होते. या घटनेत पोलीस अधीक्षकांसह सहा पोलीस जखमी झाले होते. या घटनेनंतर, राज्यातील आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारवर तीव्र टीका झाली होती. त्यांच्यावर अतिरेक्यांसमोर झुकल्याचा आरोपही करण्यात आला होता.

आयएसआयशी संबंध : दुबईत राहणारा अमृतपाल सिंह याला गेल्या वर्षी अभिनेता दीप सिद्धूने स्थापन केलेल्या 'वारीस पंजाब दे'चे प्रमुख बनवण्यात आले होते. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दीप सिद्धूचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. अमृतपाल सिंहचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि परदेशातील दहशतवादी गटांशी जवळचे संबंध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अप्रत्यक्षपणे धमकी देणारा अमृतपाल पंजाबमधील परिस्थिती अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असून शीख तरुणांना आपल्या 'वारीस पंजाब दे' या संघटनेकडे आकर्षित करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांचे शांतता राखण्याचे आवाहन : या प्रकरणी पंजाब पोलिसांनी लोकांना शांतता आणि सौहार्द राखण्यास सांगितले आहे. पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'सर्व नागरिकांना शांतता आणि सद्भाव राखण्याची विनंती करण्यात येत आहे. पंजाब पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काम करत आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये किंवा खोट्या बातम्या पसरवू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.

भगवंत मान अमित शाहंना भेटले : या महिन्याच्या सुरुवातीला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याशी सीमावर्ती राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा केली होती. केंद्राने सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी सीआरपीएफ आणि दंगलविरोधी दल आरएएफचे सुमारे 1900 जवान पाठवले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्रीय गृह मंत्रालय काही खलिस्तानी सहानुभूतीदारांच्या नूतनीकरणाच्या कारवाया पाहता पंजाबमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा : Kiran Patel Fake PMO Officer : गुजरातच्या व्यक्तीचा असाही प्रताप! बनावट पीएमओ अधिकारी बनून घेतली झेड प्लस सुरक्षा!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.