ETV Bharat / bharat

७ महिने, १४ खून...एकच पॅटर्न! ४० ते ७० वर्षे वयोगटातील महिला निशाण्यावर; सिरियल किलिंगच्या घटनांनी दहशत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 4:45 PM IST

Crime News
Crime News

Crime News : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात गेल्या ७ महिन्यांत १४ महिलांची हत्या झाली आहे. या सर्व हत्या एकाच प्रकारे करण्यात आल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी..

बरेली (उत्तर प्रदेश) Crime News : देशात सिरियल किलिंगच्या घटना काही नव्या नाहीत. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र आता उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात जे घडतंय ते अत्यंत भयावह आहे! येथे गेल्या काही महिन्यांपासून प्रौढ महिलांचे मृतदेह मिळतायेत. या सर्व महिलांची हत्या एकाच पद्धतीनं करण्यात आली आहे. आतापर्यंत या परिसरात तब्बल १४ महिलांची हत्या झाली. ताजी घटना रविवारी (२६ नोव्हेंबर) घडली.

५५ वर्षीय महिलेची हत्या : नुकतंच घडलेलं प्रकरण शिशगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातलं आहे. येथे गावातील एक ५५ वर्षीय महिला आपल्या शेतात कामासाठी गेली होती. तर महिलेचा पती आणि मुलगा शिशगड येथे गेले होते. सायंकाळी ते घरी परतले असता महिला शेतातून परतली नव्हती. कुटुंबीय जेव्हा शोध घेत शेतात पोहोचले, तेव्हा त्यांना काही अंतरावर महिलेचा मृतदेह पडलेला आढळला.

अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल : मृतदेह पाहून कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी तातडीनं याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिलेच्या गळ्यात साडीचा फास बांधून त्यानंतर डोक्यात वार करून तिचा खून झाल्याचं कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं तपास सुरू केला. यासोबतच महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आपलं कोणाशीही वैर नसल्याचं मृत महिलेच्या मुलानं पोलिसांना सांगितलंय. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

परिसरात दहशत : या घटनेनं परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या भागात महिलांच्या हत्येच्या घटना मे महिन्यात सुरू झाल्या. अशा घटना अजूनही घडत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात काम करणाऱ्या ४० ते ७० वयोगटातील महिला या सायको किलरच्या शिकार आहेत. या हत्येनंतर आता परिसरातील महिला आणि मुलं घराबाहेर पडण्यासही घाबरतायेत. आतापर्यंत अशा १४ हत्यांपैकी केवळ ३ महिलांच्या खुनाचा खुलासा झाला आहे.

५ मे ते २६ नोव्हेंबर दरम्यान १४ महिलांची हत्या :

  1. पहिली घटना - शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या एका गावातील महिला ५ मे रोजी सायंकाळी शेतात गेली होती. यादरम्यान ती बेपत्ता झाली. नंतर तिचा मृतदेह शेतात आढळून आला.
  2. दुसरी घटना - १७ जून रोजी शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणारी महिला बाजारात गेली होती. यादरम्यान ती बेपत्ता झाली. त्यानंतर दोन दिवसांनी १९ जून रोजी उसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेचा अजूनही छडा लागलेला नाही.
  3. तिसरी घटना - शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणारी महिला २९ जून रोजी बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी उसाच्या शेतात महिलेचा मृतदेह सापडला. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
  4. चौथी घटना - २२ जुलै रोजी शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह शेतात आढळून आला. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी रामपुरा गावातील राजेंद्र याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  5. पाचवी घटना - १ ऑगस्ट रोजी मीरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेचा मृतदेह नदीत तरंगताना आढळला. त्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली नाही.
  6. सहावी घटना - १० ऑगस्ट रोजी पानवाडिया गावाच्या जंगलात शाही पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळला.
  7. सातवी घटना - २३ ऑगस्ट रोजी शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह शेतात आढळून आला. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं.
  8. आठवी घटना - ४ सप्टेंबर रोजी मीरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात एका महिलेचा मृतदेह आढळला. महिलेचं वय सुमारे ४५ वर्षे होतं. आतापर्यंत महिलेची ओळख पटलेली नाही.
  9. नववी घटना - १६ ऑक्टोबर रोजी मीरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या महिलेचा मृतदेह झुडपात सापडला होता. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
  10. दहावी घटना - १ नोव्हेंबर रोजी शिशगड पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेचा मृतदेह जंगलात आढळून आला. ही महिला जंगलात गवत गोळा करायला गेली होती. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
  11. अकरावी घटना - ९ नोव्हेंबर रोजी एका सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या ६५ वर्षीय पत्नीचा मृतदेह जंगलातून सापडला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
  12. बारावी घटना - १९ नोव्हेंबर रोजी शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती नायपाल सिंग याला अटक करून तुरुंगात पाठवलं.
  13. तेरावी घटना - २० नोव्हेंबर रोजी शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या महिलेचा मृतदेह जंगलाजवळील उसाच्या शेतात आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासासाठी पाठवला.
  14. चौदावी घटना - २६ नोव्हेंबर रोजी शिशगड पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह शेतात आढळून आला. या प्रकरणातही आरोपींचा सुगावा लागलेला नाही.

हेही वाचा :

  1. लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या महिलेचे केले ३१ तुकडे! जोडप्याला अटक
  2. रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या, एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचे झाले चार तुकडे
  3. धक्कादायक! आधी पत्नीला जिवंत जाळलं, मग दगडानं ठेचून सासऱ्याची केली हत्या, गोळी झाडून केली आत्महत्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.