मुंबईAccused Mahayuti candidates : महायुतीकडून अखेर मुंबई, उपनगर तसंच लगतच्या लोकसभा मतदारसंघात उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. या उमेदवारांच्या प्रचाराला महायुतीकडून सुरुवात करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा आयोजित केल्या आहेत. मात्र, ज्या नेत्यांवर किरीट सोमैया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, तेच नेते आता महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहेत. आता किरीट सोमैया या नेत्यांचा प्रचार करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सोमैया यांनी प्रचार करून दाखवावाच :या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार ॲड. अनिल परब यांनी किरीट सोमैया यांना आव्हान दिलं आहे. रवींद्र वायकर, यामिनी जाधव या नेत्यांच्या विरोधात अत्यंत आक्रमकपणे सोमैया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसंच त्यांची ईडी चौकशी लावून हिशोब केला जाईल, अशी वक्तव्यं केली होती. आता महायुतीच्या यादीत स्टार प्रचारक म्हणून किरीट सोमैया यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांनी या उमेदवारांचा प्रचार करून दाखवावाच, असं आव्हान अनिल परब यांनी दिलं आहे. तसंच या उमेदवारांकडून किरीट सोमैया हिशोब मागणार का? असा प्रश्न परब यांनी उपस्थित केला आहे.