महाराष्ट्र

maharashtra

'वंचित'चा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न! पुण्यातून वसंत मोरे उमेदवार? प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट - Third Alliance in Maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 5:31 PM IST

Updated : Mar 29, 2024, 6:22 PM IST

Third Alliance in Maharashtra : काही दिवसांपूर्वी मनसेला रामराम ठोकलेले नेते वसंत मोरे (Vasant More) आता वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मोरे यांनी शुक्रवार (29 मार्च) प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. तर दुसरीकडं आंबेडकर हे तिसरी आघाडी तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येतंय.

वसंत मोरे प्रकाश आंबेडकर यांची भेट
वसंत मोरे प्रकाश आंबेडकर यांची भेट

मुंबई Third Alliance in Maharashtra : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी बरोबरची चर्चा अद्याप संपलेली नाही असं स्पष्ट केलं असलं तरी दुसरीकडे राज्यात तिसरी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्यातील ज्या संघटना सोबत येतील त्यांना सोबत घेऊन निवडणुका लढवण्याचा विचार सुरू केला असल्याचे ( Prakash Ambedkar) प्रकाश आंबेडकर यांनी संकेत दिले आहेत. वसंत मोरे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या 'राजगृह' या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये आपली (Pune Lok Sabha) पुण्यातील उमेदवारीबद्दल सकारात्मक चर्चा झाल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.

पुण्यातून वसंत मोरे उमेदवार? : वसंत मोरे यांनी सांगितलं की, "मी पुण्यातून निवडणूक लढवणार हे स्पष्टच आहे. त्याच दृष्टीने मी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यांच्याशी चांगल्या पद्धतीची चर्चा झाली आहे. ही माझी पहिलीच भेट होती. त्यामुळे प्राथमिक चर्चा झाली आहे. पक्षात प्रवेश करायचा की पाठिंबा घेऊन निवडणूक लढवायची याबाबत अजून विचार सुरू आहे."

सर्वत्र उमेदवार उभे करणार :या संदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "मोरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. अजून बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत. येत्या तीन-चार दिवसांत या गोष्टी घडतील. मात्र, आगामी निवडणुकांमध्ये आपण राज्यात सर्वत्र उमेदवार उभे करणार आहोत. त्या दृष्टीने पर्याय आणि प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातून कोणाला मदत करायची याबाबतही आता चर्चा झाली. तसंच, महाविकास आघाडीसोबत अजूनही चर्चा संपलेली नाही. महाविकास आघाडीने आपल्याला केवळ तीन जागा देऊ केल्या होत्या. त्यांच्यावर चर्चा झाली नाही असं त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं. मात्र, अजूनही काही गोष्टी घडू शकतात."

तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरू :राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने जर विचार केला तर आम्ही आमची ताकद या मतदारसंघांमध्ये आहे तिथे उमेदवार उभा करूच. मात्र, जिथे मदत घ्यायची आहे तिथे अन्य समविचारी संघटनांची आणि पक्षांची मदत घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्ही चर्चा यापूर्वी केली आहे. तसंच, प्रकाश शेंडगे यांच्याशी ही चर्चा सुरू आहे. अन्य काही संघटनांसोबतही चर्चा सुरू आहे असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. आंबेडकर यांनी या संपूर्ण प्रक्रियेला तिसरी आघाडी असं नाव दिलं नसलं तरी त्यांचा तसा प्रयत्न सुरू आहे.

Last Updated : Mar 29, 2024, 6:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details