महाराष्ट्र

maharashtra

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अपघात; पुण्यातील दोन वकील जागीच ठार

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 6:48 AM IST

Satara Accident News : पुणे-बंगळुरू महामार्गावर रविवारी झालेल्या दुचाकी अपघातात पुण्यातील दोन वकील जागीच ठार झाले. कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत हा अपघात घडला. न्यायालयीन कामकाजाच्या निमित्तानं हे दोन वकील पुण्याहून कोल्हापूरकडं जाताना ही घटना घडली.

Satara Accident News
साताऱ्यात भीषण अपघात

सातारा Satara Accident News : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर संरक्षक कठड्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात पुण्यातील दोन वकील जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीत घडली. प्रशांत विश्वास भोसले (वय ३४), अमर तुकाराम अलगुडे (वय ३५, रा. धनकवडी, पुणे), अशी मृत वकिलांची नावे आहेत.



न्यायालयीन कामासाठी कोल्हापूरला जाताना अपघात: प्रशांत भोसले आणि अमर अलगुडे हे व्यवसायाने वकील असून ते पुण्यातील न्यायालयात प्रॅक्टिस करतात. न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने ते रविवारी पुण्याहून कोल्हापूरकडे निघाले होते. दोघांनाही चार चाकी गाडी चालवता येत नव्हती. त्यामुळं ते टीव्हीएस ज्युपिटरवरून जात होते. पुणे-बंगळूर महामार्गावर वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीत संरक्षक कठड्याला त्यांची दुचाकी धडकली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.


मृतदेह दिले नातेवाईकांच्या ताब्यात : अपघातस्थळावरील परिस्थिती पाहता दुचाकी संरक्षक कठड्याला धडकून अपघात झाल्याचं चित्र स्पष्ट झालं. संरक्षक कठड्यावर आपटल्याने त्या ठिकाणी रक्ताचे डाग देखील दिसून आले. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी घटनास्थळी भेट दिली. कराड उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

टेम्पो आणि मालट्रकचा अपघात : या आधीही आशीच एक घटना घडली होती. पुणे-बंगळुरू महामार्गावर 14 सप्टेंबर रोजी रात्री आयशर टेम्पोने मालट्रकला जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात आयशर टेम्पो मालक, चालक आणि क्लीनरचा जागीच मृत्यू झाला होता. तिघेही बेळगाव जिल्ह्यातील होते.

आयशर टेम्पोचा चक्काचूर : मंगळुरूहून मुंबईकडे निघालेल्या मालट्रकचा टायर फुटल्याने ट्रक महामार्गाच्या कडेला मोटे वस्तीसमोर उभा होता. टायर बदलल्यानंतर चालकाने ट्रक सुरू करून मार्गस्थ होत असतानाच आयशर टेम्पोने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघतातात टेम्पोतील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघात एवढा भीषण होता की, मालट्रकमध्ये घुसल्यामुळे आयशर टेम्पोचा चक्काचूर झाला होता. पोलीस आणि शिरवळ रेस्क्यू टीमने क्रेन आणि जेसीबीच्या साह्याने टेम्पो बाजूला काढला होता.

हेही वाचा -

  1. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: कंटेनरला धडकून कारचा चुराडा, तीन ठार
  2. बुलडाणा : एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 1 ठार तर 15 प्रवासी जखमी
  3. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाला डुलकी लागल्यानं तीन जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details