संजय राऊत यांची पत्रकार परिषद मुंबई Sanjay Raut criticizes Amit Shah : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यात सर्जिकल स्ट्राइक, पुलवामा हल्ला, कलम 370, काश्मीरी पंडित असं विविध मुद्दे आहेत. यावरून अमित शाह यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. याला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
कलम 370 हटवून कोणते दिवे लावले : ज्यांनी औंगाबादचं नाव बदलण्यास विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. बाळासाहेबांच्या वारसांना लाज वाटावी असं, काम त्यांनी केल्याची अमित शाह यांनी मंगळवारी टीका केली. त्याला उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "लाज तुम्हालाच वाटली पाहिजे. अमित शाह महाराष्ट्रात येवून महाराष्ट्रातल्या जनतेचं मनोरंजन करतात. कधी मोदी येतात, कधी अमित शाह येतात. महाराष्ट्रातली जनता फक्त यांच्या सभा ऐकून मनोरंजन करून घेते. मात्र, कोणीही टाळ्या वाजवत नाही. 370 कलम हटवण्याला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. अमित शाह, तुम्ही आपली स्मरणशक्ती व्यवस्थित करून घेतली पाहिजे. 370 कलम हटवून कश्मीरमध्ये काय दिवे लावले?", असा टोला त्यांनी शाह यांना लगावला आहे.
सर्जिकल स्ट्राइकबाबत शाह खोटं बोलले : "काश्मीरच नाव घ्यायची तुमची लायकी नाही. सर्जिकल स्ट्राइकबाबत आपण लोकांशी खोटं बोलता. याचे आजही पुरावे उपलब्ध नाहीत. आजही शंका निर्माण होत आहे. लाज तुम्हाला वाटली पाहिजे. काश्मीरचा तरुण आजही बेरोजगार आहे, याची लाज तुम्हाला वाटली पाहिजे. 2014 ला आपली घोषणा होती, पाकव्याप्त काश्मीर भारतात आणू काय झालं त्याचं? याची लाज तुम्हाला वाटली पाहिजे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
महायुतीमध्ये अद्यापही संभ्रम :जागावाटवरून महायुतीमध्ये अद्यापही संभ्रम आहे. भाजपा सर्वाधिक जागा घेत असून शिवसेना शिंदे गटाच्या वाटेची संभाजीनगर येथील जागा देखील जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, " संभाजीनगरची जागा आम्ही लढत आहोत. खरी शिवसेना लढणार आहे. अमित शाह यांनी गॅंग निर्माण केली आहे. त्यांच्याकडून ती जागा काढून घेतली आहे. त्याच्याशी आमचा संबंध नाही. ते शिंदे टोळीच्या जागा घेत आहेत. महाराष्ट्रात आमच्या जागा आहेत. परंपरेनं त्या आम्ही लढतो आहोत," असं राऊत म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांवर आमचा विश्वास : महाविकास आघाडीमध्येदेखील अद्याप जागा वाटपावरून एकमत झालं नाही. प्रकाश आंबेडकर यांना किती जागा द्यायच्या? त्यांना महाविकास आघाडीत स्थान द्यायचं की नाही? याबाबतदेखील तीन पक्षांमध्ये एकमत झालेलं नाही. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "प्रकाश आंबेडकरांचं पत्र आपण वाचायचं असतं. ते उत्तम वक्ते आहेत. बाबासाहेब आंबेडकर उत्तम लेखक आणि पत्रकार होते. त्यांचा वारसा प्रकाश आंबेडकर लिखाणामधून चालवत असतील, तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्यांची भूमिका आम्हाला संशयास्पद वाटत नाही. आम्ही प्रामाणिकपणं त्यांच्यावर विश्वास ठेवतो. आमचा मायावतींवर विश्वास नाही. त्या भाजपाला अप्रत्यक्षरीत्या मदत करत आहेत. मायावतींवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्या दबल्या गेलेल्या आहेत. पण, प्रकाश आंबेडकरांचं तसं नाही. ते महाराष्ट्रातल्या मातीतले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत. मोदींची हुकूमशाही गाडण्यासाठी आमच्यासोबत उभे राहतील. भाजपाला अप्रत्यक्ष-प्रत्यक्ष कुठल्याही प्रकारची मदत त्यांच्याकडून होणार नाही," असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केलाय.
अमित शाह यांनी विरोधकांना मंगळवारी दिलं आव्हान-आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये शाह यांच्या उपस्थितीत भाजपाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपस्थितांना एक लाख हनुमान चालीसाचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंसह राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांनादेखील या सभेत अमित शाह यांनी आव्हान दिलं आहे.
हे वाचलंत का :
- देशातील पहिल्या पाण्याखालून धावणाऱ्या मेट्रोचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; काय आहेत मेट्रोची वैशिष्ट्ये?
- 'गोदावरी नदी'त कोण लगावणार विजयाची 'डुबकी'? खासदार गोडसे हॅट्रीक करणार की भाजपाचं फुलणार कमळ?
- अमित शाहांची जोरदार फटकेबाजी; शरद पवारांना दिलं ओपन चॅलेंज, राहुल गांधींवरही हल्लाबोल