महाराष्ट्र

maharashtra

संविधानावर हल्ला करणाऱ्यांचे होळीमध्ये दहन करणं हे आमचं कर्तव्य-संजय राऊत - SANJAY RAUT NEWS

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 1:36 PM IST

Updated : Mar 25, 2024, 7:05 AM IST

होळीच्या दिवशी खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि केंद्र सरकावर जोरदार टीका केली. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी युती तोडण्याच्या घोषणेवरही खासदार राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

Sanjay Raut news today
Sanjay Raut news today

मुंबई :खासदार तथा ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपास तसेच मोदी सरकारचा समाचार घेतला. ते म्हणाले, " सध्या राज्यात सरकारकडून वेगळ्या पद्धतीनं शिमगा सुरू आहे. पक्ष फोडाफोडी करणे, ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीती दाखवणे, विरोधकांवर दबाव टाकत सरकारकडून दररोज शिमगा सुरू आहे. हा शिमगा लवकर संपेल. पुढील वर्षी एक चांगला धार्मिक आणि सांस्कृतिक शिमगा साजरा करण्यात येईल.


वाईट प्रवृत्तीचे होळीमध्ये दहन करू-खासदार संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्रामध्ये शिमग्याला एक वेगळं महत्त्व आहे. होळी महाराष्ट्रमध्ये आणि महाराष्ट्रeबाहेर वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. होळीमध्ये अमंगल विचारांचे आणि वाईट प्रवृत्तींचे दहन केले जाते. महाराष्ट्रात वाईट गोष्टींचा उदय झालाय. महाराष्ट्रातील सांस्कृतिक पातळी रसातळाला गेली आहे. या महाराष्ट्रावर विविध माध्यमातून संकट येत आहेत. ही संकट आणि वाईट प्रवृत्ती यांचा यावर्षी होळीमध्ये आम्ही दहन करू," असं यावेळी राऊत यांनी म्हटले.

आंबेडकरांचा निर्णय दुर्दैवी-पुढे बोलताना ठाकरे गटाचे नेते म्हणाले की, "प्रकाश आंबेडकर आणि आमची युती मागील दीड वर्षांपासून होती. दोन नेत्यांमध्ये बसून युती झाली होती. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडण्याची केलेली घोषणा दुर्दैवी आहे. दोन नेत्यांमध्ये युतीची घोषणा झाली होती. तर युतीबाबतचा निर्णयसुद्धा दोन नेत्यांमध्ये होणं गरजेचा होता. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे.

राजकारण कमी आणि समाजकारण जास्त व्हावे- वंचितबरोबरील युती तुटल्याबाबत खासदार राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "युती होतेवळी लोकसभा निवडणुकीचा विचार झाला नव्हता. विधानसभा आणि महानगरपालिका या निवडणुकीचा विचार झाला होता. एकत्र लढता येईल, ही दोन नेत्यांची भूमिका होती. स्वतः उद्धव ठाकरे यांनी आंबेडकर भवनमध्ये जाऊन वंचित आणि आमची युतीची घोषणा केली होती. ठाकरे आणि आंबेडकर यांचे नाते फार जुने आहे. त्यामुळे हे दोघे एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला आनंद झाला होता. राजकारण कमी आणि समाजकारण जास्त व्हावे, ही दोन नेत्यांची भूमिका होती. मात्र, आता प्रकाश आंबेडकरांनी युती तोडण्याची एकतर्फी घोषणा केली आहे."



आंबेडकरांनी निर्णयाचा फेरविचार करावा-भीमशक्ती व शिवशक्तीबाबत खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, " देशातील संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत आणि आमच्यासोबत यावे. जागा वाटपात एक-दोन जागा इकडे तिकडे होऊ शकतात. मात्र अजूनही यावर प्रकाश आंबेडकर यांनी फेरविचार करून निर्णय घ्यावा. शिवशक्ती-भीमशक्ती हे एका व्यक्तीचे नाही. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की, महाराष्ट्राचे दोन दैवत आहेत. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे माझे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या दोन्ही शक्ती महाराष्ट्रात आहेत. या दोन दैवतांना मानणारा महाराष्ट्रात मोठा समाज आहे. त्यामुळे भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्यास याचे परिणाम तुम्हाला आगामी काळात महाराष्ट्रात दिसतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संविधान सगळ्यांसाठी आदर्श-पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, " सध्या हुकूमशाहीचा उद्रेक झाला आहे. एकाधिकारशाही वाढली आहे. त्यामुळे देशात लोकशाही आणि संविधान वाचवणं ही काळाची गरज झाली आहे. संविधान सगळ्यांसाठी आदर्श आहे. राज्यात, देशात आणि जगात संविधान वाचले पाहिजे. यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. देशातील हे सरकार रोज उठून संविधानावर घाव घालत आहे. त्यामुळे संविधान आज विकलांग झाले आहे. या देशाच्या संविधानाला राज्यकर्त्यांकडून धोका आहे, हे सर्वोच्च न्यायालयानेदेखील मान्य केले आहे. संविधानावर हल्ला करणाऱ्यांचे होळीमध्ये दहन करणं हे आमचं कर्तव्य आहे," असंही खासदार राऊत म्हणाले.

भाजपाकडून उदयनराजेंचा अपमान-जागावाटपातील तिढ्याबाबत खासदार राऊत म्हणाले, "महाविकास आघाडीनं कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिलेली आहे. ती खरंतर शिवसेनेची जागा होती. मागील 30 वर्षापासून शिवसेना तिथे लढते. पण शाहू महाराजांना महाविकास आघाडीतून जागा देण्याचा प्रस्ताव आला. तेव्हा आम्ही क्षणाचाही विचार न करता आम्ही छत्रपतींसाठी ती जागा सोडली, असं राऊत म्हणाले. साताऱ्याची भूमी ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. त्या जागेसाठी भाजपाकडून अपमानित केले जात आहे. उदयनराजे यांना पाच-पाच दिवस वेटिंगला ठेवले जात आहे. त्यांना भेट दिली जात नाही. भाजपाकडून उदयनराजेंचा अपमान केला जात आहे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली. पुढे म्हणाले, " यामुळं साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी याचा विचार करावा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पाठीमागे ठामपणे असल्याचंदेखील ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा-

  1. "केजरीवाल जेलमध्ये गेले आणि संजय राऊत...", केजरीवालांचं उदाहरण देत किरीट सोमैयांचा राऊतांवर निशाणा - Kirit Somaiya News
  2. 'कंस मामा भीतीमुळे तुरुंगात टाकतात, भारतात रशिया, चीनसारखी स्थिती; संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Warns To Bjp
  3. निवडणूक रोखे घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवाल यांना अटक - PM Narendra Modi
Last Updated : Mar 25, 2024, 7:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details