महाराष्ट्र

maharashtra

घराच्या ओढीनं जाताना ट्रॅक्टर बिघडला; ट्रकच्या धडकेत चार ऊसतोड मजूर ठार, 10 गंभीर जखमी - Sangli accident

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 10:49 AM IST

Updated : Apr 2, 2024, 11:54 AM IST

ट्रकने रस्त्यात थांबलेल्या ट्रॅक्टरला धडक दिल्यानं चार ऊसतोड मजूर ठार झाले आहेत. तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री २ वाजता रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील नागज फाटा येथे घडला आहे.

Sangli accident
Sangli accident

सांगली- रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा येथे भीषण अपघातात चार ऊसतोड मजूर जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तर या अपघातामध्ये दहा ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाले आहेत. हंगाम संपवून गावी निघालेल्या ऊसतोड मजुरांच्या टोळीवर मध्यरात्रीच्या सुमारास काळानं घाला घातला. मृतांमध्ये दोन महिला, एक मुलगा आणि मुलीचा समावेश आहे.




शालन दत्तात्रय खांडेकर( वय 30 रा.जगमा), तम्मा हेगडे (वय 35), दादा आप्पा ऐवळे (वय 17) आणि निलाबाई परशुराम ऐवळे (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. मृतामधील सर्वजण हे सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील चिखलगी भुयार येथील रहिवाशी आहेत. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील दत्त साखर कारखान्याची ऊसतोडी संपवून हंगाम संपल्यानं सर्व जण ट्रॅक्टरमधून संसारसाहित्यासहित मंगळवेढा तालुक्यातील आपल्या गावी परत निघाले होते.

ट्रॅक्टरमध्ये बिघाडानं झाला शेवट-मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील नागज फाटा येथे ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे ट्रॅक्टर चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. याचवेळी मागून भरधाव आलेल्या ट्रकनं ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रॅक्टरच्या आत बसलेल्या चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टरमधील दहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना कवठेमहांकाळ आणि मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या घटनेमुळे ऊसतोड मजुरांच्या चिखलगी भुयार या गावावर शोककळा पसरली आहे.

  • ऊसतोडीचा हंगाम असल्यानं अनेक शेतमजुरांच्या टोळ्या ऊसतोडीसाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. संसार चालविण्याकरिता ऊसतोड मजुरांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर करावे लागते. अशावेळी संसारोपयोगी साहित्य घेऊन मजूर ट्रॅक्टर अथवा ट्रकमधून प्रवास करतात.

रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी काय करावे?

  • वाहन चालकानं पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. वाहनाचे इंडिकेटर, हॉर्न आणि ब्रेक व्यवस्थित सुरू असल्याची खात्री करूनच प्रवासाला सुरुवात करावी. रात्रीच्या वेळी वाहन रस्त्यावर उभे करता बाजूला घेऊन काळजी घ्यावी.

हेही वाचा-

Last Updated : Apr 2, 2024, 11:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details