महाराष्ट्र

maharashtra

मुख्यमंत्री कार्यालयातील शिपायाची हत्या; चिकन तंदुरीच्या पैशावरून झाला वाद - Mumbai Crime News

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 10:15 PM IST

Mumbai Crime News : चिकन तंदुरीच्या पैशांवरून झालेल्या भांडणात पाच जणांनी मिळून मुख्यमंत्री कार्यालयातील शिपायाची हत्या (Peon Murder) केल्याची घटना मुलुंड पश्चिमेत घडलीय. मुलुंड पोलिसांनी (Mulund Police) याप्रकरणी पाच जणांना अटक केलीय.

Mumbai Crime News
शिपायाची हत्या

मुंबई Mumbai Crime News :राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शिपायाची हत्या (Peon Murder) केल्याची खळबळजनक घटना मुलुंड पश्चिम परिसरात घडलीय. या धक्कादायक घटनेत या शिपायाचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केल्याची माहिती, मुलुंड पोलीस ठाण्याचे (Mulund Police) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी दिलीय.

तंदुरीच्या पैशावरून झाला वाद :चिकन तंदुरीचे २०० रुपये देण्यावरून झालेल्या भांडणातून ही घटना घडली होती. अक्षय नार्वेकर (वय ३०) असं हत्या करण्यात आलेल्या शिपायाचं नाव आहे. त्याचा मित्र आकाश हा गंभीररित्या जखमी झाला आहे. अक्षय हा ठाण्यातील किसन नगर, वागळे इस्टेट येथे राहण्यास असून त्याचा मित्र आकाश हा मुलुंड पश्चिम वैशाली नगर परिसरात राहणारा आहे. अक्षय हा रविवारी दुपारी ठाण्यातील किसन नगर येथील इम्रान खान याच्या चिकन सेंटर येथे चिकन तंदुरी घेण्यासाठी गेला होता. त्याने तंदुरी घेतल्यानंतर इम्रानने तंदुरीचे २०० रुपये मागितले होते. अक्षयने रोख पैसे नसल्याचं सांगून नंतर देतो असं इम्रानला सांगितलं. परंतु इम्राननं त्याला आताच पैसे पाहिजे म्हणून अक्षय सोबत वाद घातला. अक्षयनं त्याला २०० रुपये 'गुगल पे'वर पाठवून तात्पुरता वाद मिटवला होता.


कशी घडली घटना : सायंकाळी अक्षय आणि आकाश हे मुलुंड पश्चिम वैशाली नगर येथे इम्रानचा भाऊ सलीम याच्या चिकन सेंटर येथे गेले. त्याठिकाणी इम्रान देखील आला होता. दुपारच्या तंदुरीच्या पैशावरून झालेला वाद पुन्हा उफाळून आला. सलीम आणि इम्रान यांनी अक्षयला मारहाण केली. स्थानिकांनी वाद मिटवून अक्षयला तेथून जाण्यास सांगितलं. अक्षय आणि आकाश काही अंतरावर जाताच सलिम आणि इम्रान हे दोघे भाऊ आणखी तिघांना घेऊन त्या ठिकाणी आले आणि पाचही जणांनी अक्षय आणि आकाशला मारहाण करण्यास सुरुवात केली. सलीमनं सोबत आणलेल्या चाकूनं अक्षय आणि आकाश यांच्यावर वार केला आणि इम्राननं अक्षयच्या डोक्यात लोखंडी रॉडनं प्रहार करून पाचही जणांनी तेथून पळ काढला.

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल : या घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत जखमींना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात आणण्यात आलं होतं. डॉक्टरांनी जखमी दोघांपैकी अक्षयला मृत घोषित केलं आणि आकाशवर प्राथमिक उपचार करून सायन रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलं. मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरुद्ध हत्या, कट रचणे, हत्येचा प्रयत्न या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून इम्रान मेहमुद खान (वय २७), सलिम मेहमूद खान (वय २९), फारुख बागवान (वय ३८), नौशाद बागवान (वय ३५) आणि अब्दुल बागवान (वय ४०) यांना अटक केली. अटक करण्यात आलेले इम्रान आणि सलिम हे दोघे सख्ये भाऊ असून फारुख नौशाद आणि अब्दुल हे तिघे सख्ये भाऊ आहेत अशी माहिती, पोलिसांनी दिली. पाचही जणांना सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा -

  1. कोल्हापूर शहर हादरलं; एकाच दिवशी तीन जणांची हत्या? - Kolhapur Muder News
  2. नाशिकमध्ये धुलिवंदानाच्या सणाला गालबोट; आईसमोर रेकॉर्डवरील गुन्हेगाराची धारदार शस्त्राने हत्या... - Nashik Muder News
  3. Shubhangi Jogdand Muder Case : शुभांगी जोगदंड हत्या प्रकरणी महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती

ABOUT THE AUTHOR

...view details