महाराष्ट्र

maharashtra

दक्षिण मुंबई जागेसाठी इच्छुक उमेदवार मंगल प्रभात लोढा यांनी घेतली राज ठाकरेंची भेट - Lok Sabha Election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 5:25 PM IST

Mangal Prabhat Lodha : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. या सर्व घडामोडीत आज (11 एप्रिल) मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली.

Mangal Prabhat Lodha
राज ठाकरे

मुंबईMangal Prabhat Lodha:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे महायुतीत सामील होईल आणि दक्षिण मुंबई लोकसभा जागेवर उमेदवार मनसेकडून दिला जाईल, अशी शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवली जात होती; परंतु आता मनसेने ही निवडणूक न लढण्याचा निर्धार घेतला असून त्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याकरता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात आता भाजपा अथवा एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवार दिला जाणार आहे. यासाठी अनेक उमेदवारांची नावं चर्चेत असताना त्यातील एक म्हणजे राज्याचे मंत्री आणि या मतदारसंघातील मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा.

दक्षिण मुंबईतून मंगल प्रभात लोढा इच्छुक :१८ व्या लोकसभेसाठी महायुतीत जागा वाटपाचा तिढा अद्याप शिल्लक आहे. विशेष म्हणजे महायुतीत येण्याबाबत राज ठाकरे यांची मनसे काय भूमिका घेते याकरिता जागा वाटपाचा तिढा संपुष्टात येत नव्हता; परंतु आता राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर जागा वाटपात भाजपा आणि शिंदे गटाची सरशी राहणार आहे. अशात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर भाजपा आणि शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. येथे विद्यमान खासदार हे उबाठा सेनेचे अरविंद सावंत असल्याने शिंदे गटाकडून या जागेवर दावा केला जात आहे तर दुसरीकडे या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व असल्या कारणाने भाजपाकडून तसे प्रयत्न केले जात आहेत. या मतदारसंघासाठी भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच मंत्री मंगल प्रभात लोढा हे इच्छुक आहेत. तर शिंदे गटाकडून यशवंत जाधव यांचं नाव चर्चेत आहे.

'या' कारणानं घेतली राज ठाकरेंची भेट :यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत. अशा परिस्थितीमध्ये आज मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबद्दल मंगल प्रभात लोढा किंवा राज ठाकरे यांच्याकडून काहीही सांगण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी मोदी यांना लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्थ पाठिंबा दिला असल्याकारणाने त्यांचे आभार मानण्यासाठी ही भेट घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. तरी देखील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपण उभे राहिल्यास आपणाला पाठिंबा देण्यात यावा, याकरता मंगल प्रभात लोढा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याचं समजत आहे.

असं आहे, विधानसभा मतदारसंघावरील वर्चस्व :दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी वरळीमध्ये उबाठा गटाचे आदित्य ठाकरे, त्याचबरोबर शिवडी येथे उबाठा गटाचे अजय चौधरी हे आमदार आहेत. तर मलबार हिल येथे भाजपाचे मंगल प्रभात लोढा, कुलाबा येथे भाजपाचे राहुल नार्वेकर हे विद्यमान आमदार आहेत. भायखळा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या यामिनी यशवंत जाधव या आमदार असून मुंबादेवी विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे अमीन पटेल हे आमदार आहेत. अशा प्रकारे भाजपाचे २, उबाठा गटाचे २, शिंदे गटाचा १ आणि काँग्रेसचा १ असे एकूण ६ आमदार दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात आहेत.

अरविंद सावंत हॅट्रिकच्या प्रयत्नात :उबाठा गटाचे नेते, खासदार, अरविंद सावंत हे या विभागातून हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा १,२८,५६८ मतांनी पराभव केला होता. २०१४ मध्ये अरविंद सावंत यांना ३,७६,६०९ मतं मिळाली होती. तर काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना २,४६,०४५ मतं मिळाली होती. मागच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत यांनी १,००,०६७ मतांनी काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. शिवसेनेचे अरविंद सावंत यांना ४,२१,९३७ मतं मिळाली होती. तर काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना ३,२१,८७० मतं मिळाली होती. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडाने फूट पडल्यानंतर अरविंद सावंत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत असून यंदा या विभागातून ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असून हॅट्रिक साधण्याच्या प्रयत्नात आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना भेटलेली एकूण मते :
वरळी : आदित्य ठाकरे - ८९,२४८
शिवडी : अजय चौधरी ७७,६८७
भायखळा : यामिनी जाधव - ५१,१८०
मलबार हिल : मंगल प्रभात लोढा - ९३,५३८
कुलाबा : राहुल नार्वेकर - ५७,४२०
मुंबादेवी : अमिन पटेल - ५८,९५२

राज ठाकरे यांच्या पाठिंब्यासाठी भेट :तसं पाहिलं तर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचं विजयातील अंतर हे कमी झालेलं दिसून येतं. २०१४ मध्ये त्यांनी १,२८,५६८ मतांनी विजय संपादन केला होता. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी १,००,०६७ मतांनी या मतदारसंघातून विजय संपादन केला होता. अशा परिस्थितीमध्ये या लोकसभा मतदारसंघातील येणाऱ्या विधानसभा मतदारसंघावर नजर टाकली तर मलबार हिल या मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत मंगल प्रभात लोढा यांना सर्वांत जास्त म्हणजे ९३,५३८ मतं मिळाली होती. याकरिता मंत्री मंगल प्रभात लोढा यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयाची खात्री असल्या कारणाने राज ठाकरे यांचा पाठिंबा घेण्यासाठी तसच राज ठाकरे यांनी दक्षिण मुंबई मतदार संघात एक सभा घ्यावी, असा आग्रह घेऊन मंगल प्रभात लोढा हे राज ठाकरे यांना भेटल्याची माहिती आहे.

हेही वाचा :

  1. 'शरद पवार निखारा, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है'; खासदार अमोल कोल्हे - Amol Kolhe
  2. छत्रपती संभाजीनगरमध्ये चारा बंदी लागू, पाणीटंचाईनं मराठवाडा होरपळताना उद्योगांवरही पाणी कपातीची टांगती तलवार - Marathwada water crisis
  3. रामदास तडस यांच्यावर सून पूजा तडस यांची मारहाणीसह आरोपांची सरबत्ती, तडस यांनी सर्व आरोप फेटाळले - Pooja Tadas On Ramdas Tadas

ABOUT THE AUTHOR

...view details