मुंबई Displeasure in Mahayuti and MVA : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. तर अनेक ठिकाणी प्रचाराचा धुरळाही उडत आहे. प्रचारात विरोधक सत्ताधारी आमने-सामने येत आहेत. एकीकडं असं असतानाच दुसरीकडं महायुतीत आणि महाविकास आघाडीत जी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, त्या उमेदवारीवरून स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त केली जात असल्याचं बघायला मिळतंय. तर या नाराजीचं कारण काय? तसंच राज्यात कुठे आणि कशाप्रकारे नाराजी व्यक्त करण्यात येतेय? यासंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊया.
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ : सध्या उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे गजानन कीर्तिकर हे खासदार आहेत. येथे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, "अमोल कीर्तिकर हे कोरोनाकाळातील खिचडी प्रकरणातील भ्रष्टाचारी आहेत. लोकांच्या मनात अमोल कीर्तिकरांविषयी रोष आहे, ही जागा काँग्रेसला मिळणे अपेक्षित असताना ठाकरे गटाने अमोल कीर्तिकरांना उमेदवारी दिल्यामुळं आपण खिचडी चोराचा प्रचार करणार नाही. त्यांच्यासाठी काम करणार नाही.", असं म्हणत माजी खासदार आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
हेमंत गोडसे विरुद्ध छगन भुजबळ (नाशिक) :नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत. मात्र, ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येणार नाही हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळं आपण महायुतीतील उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असं स्थानिक कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडं हेमंत गोडसेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, ही जागा आपणाला मिळावी अशी मागणी केलीय. तसंच जर उमेदवारी मिळाली नाहीतर गोडसे बंड सुद्धा करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही बोललं जातंय.
संजय मंडलिक (कोल्हापूर) : कोल्हापुरात शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांना महायुतीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र मंडलिक यांच्या उमेदवारीवरुन स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही प्रचार यांचा करायचा आणि काम मात्र काँग्रेसची होतात, असा नाराजीचा सूर भाजपा कार्यकर्त्यांचा आहे. तसंच "महत्त्वाच्या कामाचं जाऊ द्या, मंडलिक यांचे स्वीय सहाय्यक साधा फोनही उचलत नाहीत. मंडलिकांनी भाजपा कार्यकर्त्यांची कोणती कामं केली आहेत हे दाखवून द्यावे", असं म्हणत भाजपा कार्यकर्त्यांनी संजय मंडलिकांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.
धैर्यशील माने (हातकणंगले) : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र मानेंच्या उमेदवारीवरुन भाजपाचे केंद्रीय रासायनिक खत मंत्रालयाचे संचालक, पंचायत राज समितीचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपणाला जोपर्यंत सन्मान मिळत नाही तोपर्यंत प्रचार करणार नाही, अशी भूमिका संजय पाटील यांनी घेतली आहे. तसंच खासदार धैर्यशील मानेंबद्दल लोकांच्या मनात नाराजी असल्याचंही पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळं हातकणंगले जागेवरुन महायुती दुसरा उमेदवार देण्याचा तयारीत आहे. तसंच या ठिकाणचा उमेदवार बदलण्याचे संकेत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिले आहेत.
यवतमाळ-वाशिम : सध्या या ठिकाणी शिंदे गटाच्या भावना गवळी या खासदार आहेत. ही जागा शिंदे गटालाच मिळावी अशी स्थानिक कार्यकर्त्यांची भावना आहे. तसंच जर दुसरा उमेदवार दिला तर आपण त्यांच्यासाठी प्रचार करणार नाही. काम करणार नाही, असं शिवसेना कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. तसंच या ठिकाणी आपणाला उमेदवारी मिळावी यासाठी भावना गवळी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेटही घेतली आहे. त्यामुळं यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात कोणाची वर्णी लागते हे पाहावं लागेल.