महाराष्ट्र

maharashtra

नाशिकमध्ये महायुतीकडून अखेर हेमंत गोडसेंना उमेदवारी - Hemant Godse candidate from Nashik

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 4:12 PM IST

Hemant Godse candidature announced : महायुतीनं नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. इतके दिवस नाशिक लोकसभा मतदार संघातून कोण लढवणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. नाशिक लोकसभेसाठी शांतीगिरी महाराजही इच्छुक होते. त्यांनी ताकदही दाखवली होती. मात्र आज अखेर शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Hemant Godse candidature announced
Hemant Godse candidature announced

नाशिकHemant Godse candidature announced :नाशिक लोकसभेची जागा कोण लढवणार याबाबतची उत्सकता अखेर संपली आहे. या मतदार संघातून एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी बाजी मारली आहे. एकनाथ शिंदे यांनी गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं उमेदवारी मिळाल्यानंतर हेमंत गोडसे हॅट्रिक करणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेमंत गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा :नाशिक लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरून मोठा तिढा निर्माण झाला होता. महिनाभरापूर्वी नाशिकमध्ये झालेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केल्यानंतर भाजपानं नाशिकच्या जागेवर दावा केला होता. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची देखील शिष्टमंडळानं भेट घेतली होती. भाजपाकडून अनिकेत देशपांडे, दिनकर पाटील, कंठानंद स्वामी यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून जोर लावला होता.

भुजबळांची माघार : तसंच विद्यमान अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारीसाठी दिल्लीतील भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी सांगितल्याचं म्हटलं होतं. मात्र, दिल्लीतील नेत्यांनी सांगून देखील उमेदवारी जाहीर होत नसल्यानं भुजबळांनी निवडणुकीच्या स्पर्धेतून माघार घेतली होती. भुजबळांनी माघार घेतल्यानंतर देखील ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या उमेदवाराला मिळावी, यासाठी जोर लावण्यात आला. यात सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचंही नाव चर्चेत आलं होतं. तसंच हेमंत गोडसे यांच्याबद्दल नकारात्मक सर्वेक्षणामुळं शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या देखील नावाची चर्चा झाली. बोरस्ते यांना दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेत चर्चा केली होती. अशात हेमंत गोडसे यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी सात ते आठ वेळा मुंबईच्या फेऱ्या मारत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.


शांतीगिरी महाराज यांची समजूत काढली :दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाकडून शांतीगिरी महाराजांनी अर्ज दाखल केल्यानं काल भाजपा नेते गिरीश महाजन यांनी शांतीगिरी महाराज यांची भेट घेतली. त्यानंतर महाजन यांनी शांतीगिरी महाजांची समजूत घातल्यानंतर महायुतीला पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यानंतर संध्याकाळी छगन भुजबळ यांच्याशी महाजन यांनी चर्चा केलीय.

गोडसे करणार हॅट्रिक ? :नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपाची अधिक ताकद आहे. त्यामुळं भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं, मात्र वीस दिवसांच्या सस्पेन्सनंतर अखेर हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली. हेमंत गोडसे यांची लढत थेट ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत होणार आहे. राजाभाऊ वाजे यांना महिनाभरापूर्वी उमेदवारी मिळाल्यानं त्यांनीही मोठी ताकद दाखवली आहे. त्यामुळं गोडसे पुन्हा हॅट्रिक करणार का? हे पाहावं लागणार आहे.

हे वचालंत का :

  1. मोदी-शाहांच्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात स्वाऱ्या; महाराष्ट्र दिनानिमित्त संजय राऊतांची जहरी टीका - Sanjay Raut
  2. महाराष्ट्र दिन: बेळगावसह मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट करा, ठाकरे गटाच्या 'या' नेत्यांची मागणी - Maharashtra Foundation Day 2024
  3. ठरलं तर! मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंचा 'हुकमी एक्का' लोकसभेच्या रिंगणात - Lok Sabha Election

ABOUT THE AUTHOR

...view details