महाराष्ट्र

maharashtra

महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, उदय सामंत घेणार गडकरी, फडणवीसांची भेट - Lok Sabha elections

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 3:26 PM IST

Lok Sabha Elections : महायुतीत जागावाटपाचा वाद कायम आहे. त्यामुळं येत्या दोन-तीन दिवसांत अंतिम जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.

Uday Samant
उदय सामंत

उदय सामंत यांची प्रतिक्रिया

मुंबईLok Sabha Elections : महायुतीतील जागा वाटपाची अंतिम यादी जाहीर झालेली नाही. दररोज बैठकांचं सत्र होत आहे. मात्र नाशिक, यवतमाळ, वाशिम रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जागावर महायुतीमध्ये एकमत होत नसल्यानं जागा वाटपाचा अंतिम निर्णय होत नाही. मात्र, पुढील 48 तासात म्हणजे दोन दिवसांमध्ये महायुतीतील जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर आमचा दावा कायम : पुढं बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर आमचा दावा कायम आहे. कारण ही शिवसेनेची जागा आहे. इथं शिवसेनेचा खासदार आहे. जो सध्या उबाठा गटामध्ये आहेत. मात्र, ही जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत. येथे महायुतीतील नेत्यांच्या आशीर्वादानं शिवसेनेचा उमेदवार अडीच ते पावणे तीन लाख मतांनी विजयी होईल, अशी आम्हाला आशा आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेसाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे इच्छुक आहेत. यवतमाळ-वाशिम जागेचाही तिढा कायम असल्याचं मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

आमचा संकल्प 45 प्लस :ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर व्हायचे आहेत, ते देखील जाहीर होतील. महायुतीची 48 जागांची यादी तुम्हाला लवकरच म्हणजे एक-दोन दिवसात दिसेल, असं सामंत म्हणाले. या निवडणुकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी 45 प्लसचा संकल्प केला आहे. 45 प्लसचा संकल्प नक्की आम्ही पार करू अशी आम्हाला आशा आहे, असं यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले.

बंडखोरीची शक्यता कमीच : राज्यातील काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता आहे. कारण हिंगोली, नाशिक, यवतमाळ-वाशिम या ठिकाणी उघडपणे नेते, कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत. त्यावर सामंत म्हणाले, बंडखोरीची शक्यता असली, तरी तसं काही होणार नाही. बंडखोरीची शक्यता खूप कमी आहे. बंडखोरी होणार नाही, याची दक्षता आमचे नेते मंडळी घेतील, असंही उदय सामंत म्हणाले.

उदय सामंत नागपूरच्या दौऱ्यावर :शिवसेना नेते उदय सामंत आजपासून दोन दिवस नागपूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी ते रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते गेले पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत. त्यानुसार आम्ही सर्वच पदाधिकारी कामाला लागल्याचं उदय सामंत म्हणाले आहे. यवतमाळच्या जागेचा तिढा हा लवकरचं सुटेल. तिथे उमेदवार जाहीर होईल, असं देखील ते म्हणाले.



हे वाचलंत का :

  1. नाराजी वाढत असताना एकनाथ शिंदेंचाही पत्ता कट झालेला दिसेल-संजय राऊत यांचा दावा - Sanjay Raut News
  2. आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यानं राम सातपुते यांची उमेदवारी रद्द करावी, अतुल लोंढे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार - Lok Sabha Elections
  3. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात काँग्रेसचे डॉ. अभय पाटील लढणार, राज्यात वंचितचा कुणाला बसणार फटका ? - lok sabha election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details