महाराष्ट्र

maharashtra

शेअर मार्केट फ्रॉड प्रकरण : मध्यप्रदेशातील कॉल सेंटर माटुंगा पोलिसांनी केलं उद्ध्वस्त, न्यायालयानं भामट्यांना ठोठावली कोठडी - Share Market Fraud

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 9:29 AM IST

Share Market Fraud Case : माटुंगा पोलिसांनी मध्यप्रदेशातील उज्जैन आणि इंदूर इथं छापेमारी करुन दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यातील एका आरोपीला पोलिसांनी अगोदरचं अटक केली होती. या भामट्यांनी माटुंग्यातील एका व्यक्तीला 8 लाखानं फसवलं होतं.

Share Market Fraud Case
संग्रहित छायाचित्र

मुंबई Share Market Fraud Case : मध्यप्रदेशातील उज्जैन, इंदूर इथं चालू असलेले कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात माटुंगा पोलिसांना यश आलं. माटुंगा पोलिसांनी कॉल सेंटर चालवणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करून विविध राज्यातील सायबर गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईमुळे माटुंगा पोलीस ठाण्यात गेल्यावर्षी आणि यावर्षी दाखल असलेल्या दोन सायबर गुन्ह्यांसह जवळपास 39 गुन्हे उघडकीस आले, अशी माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी दिली. अंकित उर्फ राजकुमार श्रीराम शिंदे आणि संजय भगवानदास बैरागी अशी मध्यप्रदेशातून अटक केलेल्या या दोन आरोपींची नावं आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी

माटुंग्यातील व्यक्तीला लावला 8 लाखाचा चुना :माटुंगा पोलीस ठाण्यातील परिसरात राहणाऱ्या चंद्रशेखर आनंदराव तायरे यांना फेब्रुवारी 2024 मध्ये एका अज्ञात भामट्यानं कॉल करुन शेअर मार्केटबाबत माहिती दिली. यावेळी या भामट्यानं बंगळुरू इथल्या एका कंपनीबाबत एक बनावट लिंक पाठवून Profit Bull नावाचं अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितलं. यावेळी त्या भामट्यानं तायरे यांना चांगले रिटर्न मिळतील, असं सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी 87 हजार 500 रुपये भरण्यास सांगितलं. त्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणावर चांगल्या रिटर्नचं आमिष दाखवलं. त्यानंतर सदर अॅपमध्ये 8 लाख 33 हजार रुपये भरण्यास भाग पाडल्याचा तक्रारदार तायरे यांनी केला.

पैसे विड्रॉल करण्याचा प्रयत्न केलावर कळलं लागला चुना :पैसे भरल्यानंतर तायरे यांनी ते विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पैसे विड्रॉल करता आले नाहीत. त्यावेळी त्यांनी आरोपीला संपर्क साधला असता तो पुन्हा वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे पाठवण्याबाबत सांगू लागला. त्यामुळे तक्रारदार यांना संशय आल्यानं त्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यास तक्रार अर्ज दिला. त्यानुसार माटुंगा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 409, 420, 467, 468, 471 सह माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 क, 66 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी ठोकल्या भामट्यांना बेड्या :या गुन्हाचा माटुंगा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर पगार आणि त्यांच्या सायबर पथकानं आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यांचं विश्लेषण केलं. यावेळी त्यांनी तांत्रिक माहितीवरुन आरोपी बहाइल राम सिंग बदोरीया ( वय 62 वर्ष ) याला ग्वालियरहून येताना 6 एप्रिलला मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेवून अटक केली. या आरोपीकडून चार डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड, चार विविध बँक खात्यांचे चेक बुक तीन मोबाईल आणि पाच सिम कार्ड जप्त करण्यात आले.

मध्यप्रदेशातून चालवत होते कॉल सेंटर :आरोपीकडं चौकशी केली असता या प्रकारच्या गुन्ह्यातून विविध बँक खात्यांवर आलेले पैसे काढून ते उज्जैन, इंदोर इथं पाठवत असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार अधिक तांत्रिक तपास करुन 10 एप्रिलला इंदूरमधील विजयनगर इथून अंकित उर्फ राजकुमार श्रीराम शिंदे आणि संजय भगवानदास बैरागी या दोघांना अटक करण्यात आली. या दोन्ही आरोपींकडं अधिक तपास केला असता गुन्ह्यातील इतर वॉन्टेड आरोपी यांच्यासह उज्जैनमधील महानंदानगर इथं कॉल सेंटर चालवत असल्याचं उघड झालं. त्यानुसार त्या कॉल सेंटरवर छापेमारी करुन 16 मोबाईल, 15 सिम कार्ड, एक लॅपटॉप, एक राउटर, तीन लाख पेक्षा अधिक लोकांचा मोबाईल क्रमांकाचा डाटा, मालमत्ता हस्तगत करण्यात आली.

न्यायालयानं ठोठावली कोठडी :या आरोपींनी वापर केलेले मोबाईल क्रमांक, बँक खाती आदीवरुन NCCR Portal वर तक्रारी तपासल्या असता एकूण 39 तक्रारी आढळून आल्या. अटक केलेल्या या दोन आरोपींना न्यायालयात हजर केलं. यावेळी त्यांना न्यायालयानं 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा :

  1. वायग्रासारख्या औषधांची विक्री करण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची फसवणूक, बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश
  2. Bogus Call Center Exposed : मुंबईत बोगस कॉल सेंटरचा खुलासा; 'असे' लुटायचे
  3. ATS Busts Illegal Call Center : एटीएसने केला अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश

ABOUT THE AUTHOR

...view details