महाराष्ट्र

maharashtra

बहिणीला परीक्षेनंतर घरी घेऊन परतत असताना काळाचा घाला, तीन भावंडांचा मृत्यू

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 9:15 PM IST

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातील बाळापूर फाट्यावर डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर असणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

chhatrapati sambhaji nagar accident two brothers and sister died in accident while return from exam
बीड महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Chhatrapati Sambhaji Nagar Accident : वनविभागाची चाचणी परीक्षा देऊन परतणाऱ्या बहिणीचा आपल्या दोन भावांसह अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरात घडली. गुरुवारी सकाळी तिघेजण दुचाकीवरून जात असताना मागून येणाऱ्या डंपरने त्यांना जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला असून तिथे असलेल्या हॉटेल चालकाने पोलिसांना या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. तसंच घटनेची माहिती कळताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून घाटी रुग्णालयात कुटुंबियांचा आक्रोश पाहायला मिळाला.


सकाळी झाला अपघात : प्रवीण भगवान अंभोरे (वय-28), प्रतिक्षा भगवान अंभोरे (वय-22), प्रदीप उर्फ लखन भगवान अंभोरे (वय 20) (रा. आकोली ता. जिंतूर) असे मृतांचे नाव आहे. हे तिघं बहीण भाऊ असून ते सातारा परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. गुरुवारी सकाळी बहीण प्रतिक्षा अंभोरे हीची वनविभागाच्या नोकरीसाठी एमआयडीसीच्या मैदानावर शारिरीक चाचणी होती. शारिरीक चाचणी देऊन तिघेजण झाल्टा फाट्याकडून देवळाई चौकाकडे येत असताना पाटीलवाडा हॉटेल समोर पाठीमागून हायवाने धक्का मारल्यामुळं ते तिघं हायवाखाली (डंपर) आले. त्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झाला. हायवा चालक अपघातानंतर तेथून पसार झाल्याची माहिती तेथील हॉटेल चालकांनी चिकलठाणा पोलिसांना दिली.

घाटी रुग्णालयात कुटुंबीयांचा आक्रोश :मोठा भाऊ प्रवीण हा एका दुकानावर काम करत होता. लहान भाऊ प्रदीप हा शिक्षण घेत होता, तर प्रतिक्षाने वनविभागात नोकरीसाठी एमआयडीसीच्या मैदानावर आज शारिरीक चाचणी दिली होती. तसंच ही नोकरी नक्की मिळेल असा विश्वासही तिला होता, अशी माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी दिली. कुटुंबातील एक पिढी क्षणात मृत्यूच्या दारात गेल्यानं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह आणण्यात आल्यावर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अपघात करणाऱ्या डंपर चालकावर गुन्हा दाखल करून तातडीनं अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा -

  1. अपघातानं केला कुटुंबावर घात; बाप-लेकाचा मृत्यू तर माय-लेकी बचावल्या
  2. पुणे सोलापूर महामार्गावर अपघात; रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला दुचाकीस्वारानं उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
  3. दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या कारला अपघात; आजोबासह चिमुकल्या नातवाचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details