महाराष्ट्र

maharashtra

अदानींची लाचारी सोडून मुंबईला वाचवा- खासदार अरविंद सावंत यांची मंत्रिमंडळाच्या 'त्या' निर्णयावरून टीका

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 9:01 PM IST

MP Arvind Sawant on Dharavi : आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी भाडेतत्त्वावर घरं उभारण्यासाठी केंद्र सरकारकडं मिठागरांची जमीन राज्य सरकारनं मागितलीय. यावरुन ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय.

MP Arvind Sawant on Dharavi
MP Arvind Sawant on Dharavi

मुंबई MP Arvind Sawant on Dharavi : 'धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली आदानीला कोट्यवधी रुपयांची जमीन मिळवून देण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. सरकारनं लाचारी सोडावी आणि मुंबईला वाचवावं,' असं आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलंय. धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी भाडेतत्त्वावर घरं उभारण्यासाठी केंद्र सरकारकडं मिठागरांची जमीन राज्य सरकारनं मागितलीय. याबाबतचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.


मंत्रीमंडळ बैठकीत काय झाला निर्णय : धारावी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आदानी यांच्या कंपनीला कंत्राट देण्यात आलंय. आता धारावीच्या झोपडपट्टीचा विकास धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून सुरु झालाय. या झोपडपट्टीमधील पात्र रहिवाशांचं पुनर्वसन धारावी परिसरातच करण्यात येणार आहे. तर या प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना भाडेतत्त्वावर घरं उपलब्ध करून देण्याचा या कंपनीचा हेतू आहे. त्यासाठी या कंपनीनं राज्य सरकारकडं जागा मागितली होती. मुलुंड जकात नाक्या जवळील मागितलेल्या जागेला भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या आणि इतर नेत्यांनी जोरदार विरोध केला. त्यामुळं या जागेबाबत संदिग्धता निर्माण झालीय. त्यामुळे अखेरीस राज्य सरकारनं आता केंद्राकडे मुंबईतील मोकळ्या मिठागरांच्या जागांसाठी मागणी करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.


मिठागरांच्या 283 एकर जागेची मागणी :राज्य सरकारनं मुंबईत असलेल्या केंद्राच्या अखत्यारीतील मिठागरांच्या जागा या धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या भाडेतत्त्वावरील घरासाठी मिळाव्यात अशी मागणी केली आहे. मुंबईतील कांजुर भांडुप विक्रोळी आणि माटुंगा या परिसरात असलेल्या मिठागरांच्या 283 एकर जागेची मागणी करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण विभागाच्या उपसचिव सू. बा. तुंबारे यांनी दिलीय. या जागांवर अपात्र रहिवाशांसाठी घरांची उभारणी अदानी मार्फत करण्यात येणार आहे. भाडेतत्त्वावर या जागा देण्यात येणार आहेत. जर एखाद्या कुटुंबाला यापैकी एखादं घर विकत घ्यायचं असेल, तर ते विकतही घेऊ शकतात असंही त्यांनी सांगितलंय.

अदानींची लाचारी सोडा, देश वाचवा - सावंत : राज्य सरकारच्या केंद्राकडे या जागा मागण्याच्या निर्णयावर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, "आता या सरकारचा खरा चेहरा उघड झालाय. केंद्र सरकारच्या मिठागरांच्या या जागांची आम्ही राज्यात सत्तेत असताना मेट्रो कारशेडसाठी जागा मागितली होती. मात्र तेव्हा केंद्रानं आणि भारतीय जनता पक्षानं जोरदार विरोध केला. आता मात्र अदानीच्या पायाशी लोटांगण घालण्यासाठी आपली लाचारी दाखवण्यासाठी या सरकारनं हीच जागा अदानींसाठी केंद्राकडे मागितलीय. मुंबईला वाचवायचं असेल तर अदानींची लाचारी करणाऱ्या अशा सरकारला धडा शिकवायला पाहिजे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध करीत आहोत. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन याचा जोरदार विरोध केला पाहिजे."

हेही वाचा :

  1. मुंबईकरांना सरकारचा मोठा दिलासा, राज्य मंत्रिमंडळानं बैठकीत घेतले 'हे' 20 मोठे निर्णय
  2. धारावी प्रकल्प अदानी समुहाला देणं सरकारला पडणार 'महागात'; सेकलिंक कंपनीचा काय आहे आरोप?

ABOUT THE AUTHOR

...view details