मुंबईMD drug smuggling : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मुंबईतल्या कुर्ला परिसरात सापळा रचून एका महिला ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आरोपीला मागील महिन्यात अटक केली. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इरळी या गावातील एमडी बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं होतं. एमडी ड्रग्जची कोट्यवधींची उलाढाल आणि ड्रग्ज निर्मिती तसंच, विक्री करणाऱ्या टोळींसाठी पैशाच्या देवाण-घेवाणीचं काम करणाऱ्या हवाला व्यावसायिकाला देखील पोलिसांनी आज अटक केली आहे, (Mumbai Police) अशी माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे. जेसाभाई मोटाभाई माली असं या हवाला व्यावसायिक म्हणजेच अंगाडियाचं नाव आहे.
अटक केलेल्या अकरा आरोपींची नावं : मुंबई पोलीस गुन्हे शाखेनं 16 फेब्रुवारीपासून केलेली ही कारवाई आजपर्यंत देखील सुरू आहे. या प्रकरणात कक्ष सातच्या पथकानं एकूण 11 आरोपींना अटक केलेली आहे. याप्रकरणी एकूण 252 कोटी 28 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे परविन बानू गुलाम शेख (वय 33), साजिद मोहम्मद आसिफ शेख उर्फ डेबस (वय 25) इजाज अली इमदाद अली अन्सारी (वय 24) आदिल इम्तियाज बोहरा (वय 22), प्रवीण उर्फ नागेश रामचंद्र शिंदे (वय 34), वासुदेव लक्ष्मण जाधव (वय 34), प्रसाद बाळसू मोहिते (वय 24), विकास महादेव मलमे (वय 25), अविनाश महादेव माळी (वय 28), लक्ष्मण बालू शिंदे (वय 25), आणि जेसाभाई मोटाभाई माली अशी अटक केलेल्या अकरा आरोपींची नावं आहेत.
सहा कोटींच्या ड्रग्जसह अटक : कक्ष सातच्या पोलिसांना कुर्ला पश्चिम परिसरातील चेंबूर सांताक्रुज लिंक रोडवर एक महिला ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती 16 फेब्रुवारीला मिळाली. त्यानंतर महिला आरोपी परवीन बानो हिला अटक करण्यात आली. हिच्या अटकेनंतर चौकशीत पोलिसांना वेगवेगळ्या आरोपींचा शोध लागला. त्यानंतर पोलिसांनी मिरा रोड येथे एका आरोपीला सहा कोटींच्या ड्रग्जसह अटक केली. तसंच, चौकशीनंतर गुजरात राज्यातील सूरतमधून दोन आरोपींना अटक करण्यात आली.
हवाला व्यावसायिक अटकेत : या गुन्ह्याचा अधिक तपास चालू असताना आरोपींकडं केलेल्या चौकशीवरुन तसंच तांत्रिक तपासद्वारे पोलीस पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी पाळत ठेवून प्राप्त केलेल्या माहितीच्या आधारे 25 मार्चला सांगलीतील इरळी गावात मोठी कारवाई केली. या कारवाईत एमडी हा ड्रग्ज बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधार प्रवीण उर्फ नागेश रामचंद्र शिंदे या आरोपीने तीन कोटी 46 लाख 68 हजार दोनशे रुपये इतकी रक्कम ठाणे जिल्ह्यातील भिवंडी रोड येथे आपल्या मित्राकडे लपवून ठेवल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. त्यानुसार पोलिसांनी आरोपी प्रवीणच्या मित्राकडून भिवंडी येथून 3 कोटी 46 लाख 68 हजार 200 इतकी रक्कम जप्त केली. हे पैसे अंगाडीयाच्या मार्फत ज्या व्यक्तींना एमडी या अंमली पदार्थाचा पुरवठा करण्यात आला त्यांनी पाठवले असल्याचं तपासात स्पष्ट झालं. एमडी हा अंमली पदार्थ विक्रेत्यांकडून घेऊन मुख्य आरोपीस देणाऱ्या हवाला व्यावसायिक जेसाबाई मोटाभाई माली या अंगाडियाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.