महाराष्ट्र

maharashtra

कुवेत बोट प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी; कुवेतहून 'असे' आले मुंबईत

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 8:18 PM IST

Updated : Feb 8, 2024, 6:28 AM IST

Kuwait boat case : कुवेत बोट प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. या तिघांनाही बुधवारी न्यायालयानं तीन दिवसांची म्हणजेच 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे तिघेही कोणत्या मार्गानं मुंबईत आले? त्यांनी काही गुन्हा केलाय का? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Kuwait boat case
Kuwait boat case

मुंबई Kuwait Boat Case :कुवेतहून आलेली एक बोट मुंबईच्या सागरी सुरक्षेला बगल देत 'गेट वे ऑफ इंडिया'वर पोहोचल्यानं खळबळ उडाली होती. 'अब्दुला शरीफ 1' असं या बोटीचं नाव असून, बोटीवरील तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयानं तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद भोवते यांनी दिली.

'अब्दुला शरीफ 1' ही कुवेती बोट काल (6 फेब्रुवारी) सकाळी 'गेट वे ऑफ इंडिया' परिसरात आढळून आली. या प्रकरणी कलम 6A, 3A अंतर्गत कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या बोटीवरील तीन आरोपींकडं कुवेतमधून भारतात येण्याची कोणतीही कागदपत्रं नसल्यानं त्यांनी अवैधरित्या भारतात प्रवेश केल्यानं त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं - उपायुक्त प्रवीण मुंडे, परिमंडळ 1

तिघेही मासेमारीच्या कामासाठी कुवेतला होते : या प्रकरणात निडीसो डिट्टो (वय -31), इन्फन्ट विजय विनोद अँथनी (वय -29), सहाया अँटोन अनिश (वय -29) यांना अटक करण्यात आलीय. हे तिघेही कन्याकुमारी येथील नागरिक असल्याचा दावा त्यांनी पोलीस तपासात केलाय. मात्र, प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांना दोन वर्षांपूर्वी 'हे' तिघेही मासेमारीच्या कामासाठी कुवेतला गेल्याची माहिती मिळाली आहे.

मालकाच्या त्रासाला कंटाळून पलायन : या तिघांनीही कुवेतमधील मालकाच्या त्रासाला कंटाळून भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, कुवेतहून आलेल्या या बोटीबाबत भारतीय नौदल, तटरक्षक दलाला माहिती नसल्यानं सागरी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या बोटीचा मालक अब्दुल्ला शाहिद गेल्या दोन वर्षांपासून या तीन जणांना केवळ खर्चापोटी पैसे देत होता, तसंच दोन वर्षे उलटूनही आरोपींना तो भारतात येऊ देत नसे, असा आरोप या तिघांनी केलाय.

26 जानेवारीला कुवेतहून रवाना : आरोपींनी याबाबत कुवेतमधील भारतीय दूतावास तसंच फागील पोलिसांकडं तक्रार केली होती, परंतु त्यांच्या तक्रारीचं काहीही झालं नाही. त्यानंतर तिघांनी एकत्र बसून मासेमारीला जात असल्याचं सांगून 26 जानेवारी रोजी बोटीचा मालक अब्दुल्ला याच्याकडून सहा हजार लिटर डिझेल बोटीत भरलं होतं. त्यानंतर ते 26 जानेवारीला कुवेतहून निघाले होते. सौदी, कतार, दुबई बॉर्डर, मस्कत, ओमान, पाकिस्तानच्या सीमा ओलांडत त्यांनी मुंबई गाठली, असं आरोपींनी पोलिसांना सांगितलंय.

बोट जप्त : या आरोपींचा विविध सुरक्षा यंत्रणांमार्फत तपास करण्यात येत आहे. त्यावेळी तिन्ही आरोपींकडं मासेमारी परवान्याची कागदपत्रं, कुवेत येथील बोट परवाना सापडला आहे. बोटीचा पंचनामा करण्यात आला असून, बॉम्ब शोधक पथकाकडून बोटीची तपासणीही करण्यात आलीय. बोटीवर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. या बोटीचे जीपीएस ट्रॅकर मशीन पोलिसांनी जप्त केलंय.

बोट मालकानं केली मारहाण : तिन्ही आरोपींनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली असून त्यांनी कोणत्या मार्गानं प्रवास केला, प्रवासादरम्यान त्यांची भेट कोणाशी झाली? याची माहिती घेण्यासाठी त्यांचं जीपीएस ट्रॅकर तपासण्यात आलंय. याबाबत कुलाबा पोलीस तपास करत आहेत. बोट मालक अब्दुल्ला यानं काठीनं मारल्यानंतर आरोपी निडिसोच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. कुलाबा पोलिसांनी जप्त केलेली कुवेती बोट 55 फूट आकाराची असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिली.

हे वाचलंत का :

  1. दिवंगत नेत्यांवर टीका करणं चुकीचं, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर शरद पवारांची टीका
  2. सरकारची तिसरी टर्म दूर नाही, काँग्रेसनं BSNL, MTNL, HL ला बरबाद केलं; राज्यसभेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
  3. उत्तराखंडमध्ये समान नागरिक संहिता लागू, UCC विधेयकाला सभागृहानं दिली मंजूरी
Last Updated : Feb 8, 2024, 6:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details