महाराष्ट्र

maharashtra

मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्यानं 80 वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 10:20 AM IST

Updated : Feb 16, 2024, 2:53 PM IST

No Wheelchair At Airport : मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्यानं एका अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हे गृहस्थ भारतीय वंशाचे होते. वेळेत व्हीलचेअर न मिळाल्यानं ते तब्येत बिघडून विमानतळावर कोसळले होते.

Mumbai airport
Mumbai airport

मुंबई No Wheelchair At Airport : मुंबई विमानतळावर व्हीलचेअरची सुविधा न मिळाल्यानं एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माहितीनुसार, मृत व्यक्ती भारतीय वंशाची असून अमेरिकन नागरिक होती. हे गृहस्थ इमिग्रेशन भागात पोहोचण्यासाठी सुमारे 1.5 किमी चालत गेले. दरम्यान ते अचानक कोसळले. त्यानंतर त्यांना नानवटी रुग्णालयात नेलं असता सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.

एअर इंडियाचं निवेदन : एअर इंडियानं एक निवेदन जारी करून या घटनेबाबत माहिती दिली आहे. विमान कंपनीनं आपल्या निवेदनात म्हटलं की, "12 फेब्रुवारी रोजी न्यूयॉर्कहून मुंबईला आलेला आमचा एक प्रवासी पत्नीसोबत इमिग्रेशन क्लिअर करण्यासाठी जात असताना कोसळला. व्हीलचेअरच्या प्रचंड मागणीमुळे, आम्ही प्रवाशाला व्हीलचेअरची मदत मिळेपर्यंत थांबण्याची विनंती केली होती. परंतु त्यानं पत्नीसोबत चालण्याचा पर्याय निवडला. कोसळल्यानंतर विमानतळावरील डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, प्रवाशाला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे त्याचा मृत्यू झाला."

ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आम्ही पीडिताच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत. त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करत आहोत-प्रवक्ता, एअर इंडिया

व्हीलचेअरची सुविधा आधीच बुक केली होती : मृत गृहस्थ भारतीय वंशाचे असून ते अमेरिकन पासपोर्टधारक होते. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं व्हीलचेअरची सुविधा आधीच बुक केली होती. विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर पत्नीला व्हीलचेअर मिळाली, मात्र पतीला व्हीलचेअर मिळू शकली नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीची व्हीलचेअर ढकलत नेण्याचा निर्णय घेतला. पत्नीला घेऊन इमिग्रेशन कार्यालयात जात असताना ते कोसळले.

विमानतळ प्राधिकरणाशी संपर्क नाही : हे जोडपं न्यूयॉर्कहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान AI-116 च्या इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करून आलं होतं. हे विमान रविवारी न्यूयॉर्कहून निघालं होतं. विमान सोमवारी सकाळी 11.30 वाजता लँड होणार होतं, परंतु ते दुपारी 2.10 वाजता लँड झालं. या घटनेसंबंधी 'ईटीव्ही भारत'नं मुंबई विमानतळ प्राधिकरणाशी सातत्यानं संपर्क साधला. परंतु त्यांच्याकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

हे वाचलंत का :

  1. इंडिगोला 1.20 कोटी तर मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला 60 लाखांचा दंड; नेमकं प्रकरण काय?
Last Updated :Feb 16, 2024, 2:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details