महाराष्ट्र

maharashtra

'किवी' होम पीचवर 8 वर्षानंतर 'कांगारुं'कडून पराभूत, भारतीय संघाला मिळाला फायदा!

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 12:38 PM IST

Updated : Mar 3, 2024, 12:46 PM IST

NZ vs AUS Test : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन इथं झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं यजमान न्युझीलंडवर 172 धावांनी दणदणीत विजय मिळवलाय. याचा भारतीय संघाला फायदा झालाय.

'कांगारुं'नी 8 वर्षांनी 'किवीं'ना त्यांच्याच घरात कसोटीत केलं पराभूत; मात्र फायदा भारतीय संघाला
'कांगारुं'नी 8 वर्षांनी 'किवीं'ना त्यांच्याच घरात कसोटीत केलं पराभूत; मात्र फायदा भारतीय संघाला

वेलिंग्टन NZ vs AUS Test : दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं यजमान न्यूझीलंडचा 172 धावांनी दारुण पराभव केलाय. कसोटी क्रिकेचमध्ये कांगारुंना आठ वर्षांनंतर किवींच्या होम पीचवर विजय मिळाला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियानं 2016 मध्ये न्यूझीलंडला घरच्या मैदानावर पराभूत केलं होतं.

भारतीय संघाला फायदा : या सामन्याच्या निकालानंतर आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठा फेरबदल झालाय. या सामन्यात झालेल्या पराभवामुळं भारतीय संघ या क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचलाय. तर न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानावर घसरण झालीय. कांगारुंकडून झालेल्या पराभवामुळं न्यूझीलंडच्या गुणांमध्ये गट होऊन ते 60 टक्क्यांवर आले आहेत. त्यामुळं जागतिक कसोटी अजिक्यपद स्पर्धेच्या ताज्या क्रमवारीत 64.58 टक्के गुणांसह भारतीय संघ पहिल्या स्थानावर विराजमान झालाय. तर या सामन्यात विजय मिळवूनही 59.09 टक्के गुणांसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे.

कांगारुंना पहिल्या डावात भक्कम आघाडी : या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरुन ग्रीन आणि नॅथन लायन यांनी चमकदार कामगिरी केली. ग्रीननं पहिल्या डावात नाबाद 174 धावा आणि दुसऱ्या डावात 34 धावा केल्या. तर लियॉननं या सामन्यात 10 बळी घेतले. त्यानं पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात सहा किवी फलंदाजांचे बळी घेतले. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन ग्रीनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. कॅमेरुन ग्रीनच्या नाबाद 174 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 383 धावांची मोठी मजल मारली होती. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीनं पाच विकेट घेतल्या आहेत. मात्र, यानंतर किवी फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात केवळ 179 धावा करु शकला. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू नॅथन लायननं 43 धावांत चार बळी घेतले. अशा प्रकारे कांगारुंना पहिल्या डावात 204 धावांची भक्कम आघाडी मिळाली.

दुसऱ्या डावात कांगारुंचे फलंदाज ढेपाळले :पहिल्या डावात 204 धावांची मोठी आघाडी मिळविल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात केवळ 164 धावांत गडगडला. यावेळी नॅथन लायननं सर्वाधिक 41 धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून पार्ट टाईम फिरकीपटू ग्लेन फिलिप्सनं पाच विकेट घेतल्या. यानंतर न्यूझीलंडसमोर विजयासाठी 369 धावांचं लक्ष्य होतं. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 369 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. टॉम लॅथम 8 धावा, विल यंग 15 आणि केन विल्यमसन फक्त 9 धावा करु शकले. रचिन रवींद्र (59) आणि डॅरिल मिशेल (38) यांनी खेळपट्टीवर संथ गतीनं खेळले. पण हे दोघं बाद होताच संपूर्ण संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. दुसऱ्या डावात किवी संघाला केवळ 196 धावा करता आल्या आहेत. ऑस्ट्रेलियानं पहिली कसोटी 172 धावांनी जिंकली.

हेही वाचा :

  1. बीसीसीआयकडून खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर, श्रेयस अय्यरसह इशान किशनची काढली विकेट
Last Updated : Mar 3, 2024, 12:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details