महाराष्ट्र

maharashtra

'संघासह इंग्लंडला परत जा नाहीतर...'; रांचीतील चौथा कसोटी सामना रद्द करण्याची खलिस्तानी 'पन्नू'ची धमकी

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 8:07 AM IST

IND vs ENG 4th Test : झारखंडची राजधानी रांची इथं होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यानं नक्षलवाद्यांना हिंसाचारासाठी भडकावलंय. तसंच दोन्ही कर्णधारांनाही धमकी दिलीय.

IND vs ENG 4th Test
IND vs ENG 4th Test

रांची IND vs ENG 4th Test : रांची इथं भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वीच खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यानं इंग्लंड संघाला सामना रद्द करुन परत जाण्याची धमकी दिलीय. तसंच याबाबत त्यानं झारखंडच्या नक्षलवाद्यांनाही भडकावलंय. रांची इथं होणारा भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना त्वरित रद्द करण्यात यावा, असं पन्नूनं म्हटलंय. याप्रकरणी मंगळवारी रांचीच्या धुर्वा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

युट्युबवर धमकीचा व्हिडिओ व्हायरल :शीख फॉर जस्टीसच्या गुरपतवंत सिंग पन्नूचा युट्युबवर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना रद्द करण्याच्या उद्देशानं त्यानं भारतीय कम्युनिष्ट पक्षाला आवाहन केलंय. नक्षलवाद्यांच्या नावानं जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये त्यानं रांचीचं जेएससीए स्टेडियम हे आदिवासींच्या जमिनीवर बांधल्याचं म्हटलंय. हा सामना आदिवासींच्या जमिनीवर होऊ नये, म्हणून त्यानं माओवाद्यांना झारखंड आणि पंजाबमध्ये गोंधळ घालण्यासही सांगितलंय. इतकचं नव्हे तर भाकपनं झारखंड आणि पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करावी, असं आवाहन करताना तो व्हिडिओत दिसतोय.

दोन्ही कर्णधारांना धमकी : पन्नूनं या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स यांनाही धमकी दिलीय. त्यानं इंग्लंडच्या कर्णधाराला भारत दौरा रद्द करून संघासह परत जाण्यासही सांगितलंय. पन्नूची धमकी मिळाल्यानंतर झारखंड पोलीस अलर्ट झाले असून स्टेडियमपासून हॉटेलपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. विमानतळापासून हॉटेलपर्यंत प्रत्येक कोपऱ्यात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. तसंच विमानतळालाही सुरक्षेचा घेराव घालण्यात आलाय.

माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल : याप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरमध्ये असंही नमूद करण्यात आलंय की, 'असे वादग्रस्त व्हिडिओ जारी करुन सरकारचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्नही करण्यात आलाय. याप्रकरणी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

रांची कसोटी दरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था : या प्रकरणाबाबत डीएसपी पीके मिश्रा यांनी सांगितलं की, "यूट्यूबच्या माध्यमातून धमकी देण्यात आली असून त्यानं स्थानिक माओवादी संघटनेलाही आवाहन केलं असून सामना न होऊ देण्याची धमकी दिलीय. यामुळं धोक्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सामन्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत."

हेही वाचा :

  1. India vs England Test : मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीतून 'आऊट'; काय आहे कारण?
  2. India Vs England : भारतीय संघानं 180 मिनिटांत केलं इंग्लंडला चितपट, कसोटीत 90 वर्षातील सर्वात मोठा पराभव

ABOUT THE AUTHOR

...view details