नागपूर Sharad Pawar Press Conference : वर्धा लोकसभा मतदारसंघात अमर काळे यांनी आज (2 एप्रिल) महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर यवतमाळमधून संजय देशमुख यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. वर्धात स्वतः शरद पवार हे अमर काळे यांना पाठबळ देण्यासाठी उपस्थित होते. तर, यवतमाळ येथे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी संजय देशमुखांसाठी प्रचार सभा घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं.
नेमकं काय म्हणाले शरद पवार : यावेळी बोलत असताना शरद पवार म्हणाले की, "दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या सभेमध्ये अनेक पक्षांचे नेते सहभागी झाले होते. त्यावेळी सर्वांची एकच भावना होती की, देशात लोकशाहीवर हल्ला होतोय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. देशाच्या घटनेवर सातत्यानं हल्ले सुरू असल्यामुळं आम्ही आघाडी केली. देशाच्या संविधानावर हल्ला होतोय, ही अत्यंत गंभीर बाब आहे." तसंच येणाऱ्या दिवसांमध्ये अजून काही नेत्यांना तुरुंगात टाकलं जाऊ शकतं. त्यामुळं येणाऱ्या दिवसात स्थिती अधिक बिघडू शकते, अशी भीती शरद पवारांनी व्यक्त केली.
यंदा देशाचा इरादा वेगळा : पुढं ते म्हणाले की, "2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितसोबत अल्पसंख्यांक समाज आणि त्यांचे नेते होते. आता त्यांच्यासोबत कोणी नाही. माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की अल्पसंख्यांक कोणाला विजयी करायचंय, यापेक्षा कोणाला पराभूत करायचंय याचा विचार करतात. यंदा देशाचा इरादा वेगळा आहे. भाजपाला जो उमेदवार पराभूत करू शकतो, अशा उमेदवारालाच लोक मतदान करतील."