महाराष्ट्र

maharashtra

"चिल्लर कार्यकर्त्याला पोलीस संरक्षण, जनता...", -सलमानच्या घराबाहेरील गोळीबारावरून राऊतांचा गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल - Sanjay Raut today News

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 12:43 PM IST

Updated : Apr 14, 2024, 1:24 PM IST

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी निवासस्थानाबाहेर अज्ञातांनी गोळीबार केल्यानं विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर टीका केली. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. यावेळी खासदार राऊत यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपावरदेखील टीका केली.

Sanjay Raut criticizes Mahayuti
Sanjay Raut criticizes Mahayuti

मुंबई- अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाचे राजकीय पडसाददेखील उमटायला सुरुवात झाली आहे. विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. खासदार संजय राऊत यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

खासदार संजय राऊत म्हणाले की," सलमान खान हे सिनेजगतातलं मोठं नाव आहे. त्यामुळे तुम्ही मला गोळीबाराबाबत प्रश्न विचारत आहात. पण, मुंबईसह महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचं संपूर्ण पोलीस खातं हे ओरिजनल शिवसेना राष्ट्रवादीतून सोडून गेलेल्या गद्दार आमदार, खासदार यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. गल्लीतला एखादा माणूस पक्ष सोडून मिंदे गटात किंवा अजित पवार गटात जातोय. त्यालासुद्धा सुरक्षा पुरवली जातेय. भाजपाच्या सर्व चिल्लर कार्यकर्त्यांनासुद्धा पोलीस संरक्षण दिलं जातं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवारांच्या चिल्लर कार्यकर्त्याला पोलीस संरक्षण आणि सामान्य जनता वाऱ्यावर आहे."

मुंबईच्या लोकल ट्रेन, मुंबईचे रस्ते, सार्वजनिक ठिकाण सर्वत्र हीच परिस्थिती आहे. फक्त बातम्या बाहेर येत नाहीत- खासदार संजय राऊत



पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "सलमान खान संदर्भात झालेली फायरिंग हा इशारा नाही तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भाजपा आणि यांच्या सरकारची पोलखोल केलेली आहे. गृहमंत्री राजकारणात अडकलेत. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. मात्र, त्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांच्यामागे यंत्रणा लावणं एवढंच सुरू आहे. पोलीस आयुक्त काय करत आहेत? पोलीस आयुक्त तर राजकीय व्यक्ती नाही ना? त्यांच मुंबईवर लक्ष आहे की नाही? ते सुद्धा भाजपच्या गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या पालख्या वाहत आहेत?" असा प्रश्न देखील खासदार राऊत यांनी पोलीस यंत्रणेवर उपस्थित केला.


दहा वर्षात रोज संविधानाची हत्या -दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा या नेत्यांच्या उपस्थितीत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावर बोलताना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते म्हणाले, "त्यांनी दहा वर्षात रोज संविधानाची हत्या केली. लोकशाहीचा मुडदा पाडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची अप्रतिष्ठा केली. त्यांच्या तोंडून संविधान रक्षणाची भाषा म्हणजे निव्वळ ढोंग आहे. तुम्ही आजचा दिवस निवडला असेल तर ती त्यांच्या मनातली भीती आहे. देशातील जनता संविधानाच्या बाबतीत अत्यंत जागृत झाल्यानं त्यांनी आजचा दिवस निवडला आहे," अशी राऊत यांनी सडकून टीका केली.

देशाला थुकरटवाडी करण्याचं काम-शुक्रवारी जम्मू कश्मीर येथे झालेल्या एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'राहुल गांधी हे चैत्र नवरात्र मांसाहार करतात' अशी टीका केली. यावर ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, "देशाचे प्रधानमंत्री 10 वर्ष देशावर राज्य करत आहेत. त्यांचं बहुमताचं सरकार आहे. ते तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांनी दहा वर्षात काय केलं? यावर बोलायला हवं. 2024 ला काय करणार आहे? यावर बोलायला हवं. पण, अशा प्रकारच कोणतही काम त्यांनी केलेलं नाही. लोकांना थुकपट्टी लावून देशाला थुकरटवाडी करण्याचं काम केलं. आमचे विरोधक मांसमच्छी खातात म्हणून त्यांना मत देऊ नका, असं वक्तव्य म्हणजे प्रधानमंत्री यांच्या प्रचाराची पातळी कोणत्या स्तरावर आणली आहे? हे आमच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे. उद्या हे अशा पद्धतीनं आमच्या सैन्यालासुद्धा शाकाहारी करतील. यांचा काय भरोसा नाही."

हेही वाचा-

  1. "सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराची घटना धक्कादायक, अब की बार गोळीबार..", सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा - Supriya Sule criticizes Mahayuti
  2. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पाचवेळा मिळालीय जीवे मारण्याची धमकी - salman khan
  3. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन अज्ञातांचा गोळीबार, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीवर पोलिसांचा संशय - Salman Khan
Last Updated :Apr 14, 2024, 1:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details