मुंबई -खासदार संजय राऊत म्हणाले की, " रामटेक, कोल्हापूर या आमच्या हक्काच्या जागा आम्ही काँग्रेसला दिल्या आहेत. त्या बदल्यात त्यांच्याकडून सांगली व मुंबई दक्षिण मध्य या जागा घेतल्या आहेत. या देशाचं नेतृत्व काँग्रेसने करावं, असं मी मानतो. आम्हाला देशाचे नेतृत्व करायचं नाही. देशाचा पंतप्रधान काँग्रेसचा व्हावा, असं आम्हाला वाटतं. एका सांगलीसाठी काँग्रेस देशाचं पंतप्रधान पद घालवणार आहे का? अखिलेश यादव, ममता बॅनर्जी नाराज झाल्या आहेत. पण आम्ही काँग्रेससोबतच आहोत आणि राहणार आहोत.
सांगलीची जागा लढणार-काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ठाकरे पक्षावर टीका केली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "मी काँग्रेस पक्षाची संबंध ठेवतो. संजय निरुपम यांनी केलेल्या आरोपाशी आम्हाला काही देणं-घेणं नाही. आमची यादी जाहीर केल्यानंतर तेव्हा जागावाटपाची चर्चा जवळपास पूर्ण झाली होती. रामटेकमध्ये आमचा विद्यमान खासदार होता. तरी आम्ही ती जागा काँग्रेसला दिली. काँग्रेसनं ती जागा घोषित केली. त्यावर आम्ही कधीच आपत्ती घेतली नाही. त्याबदल्यात आम्ही मुंबईची जागा घेतली. सांगलीच्या जागेवरून काँग्रेस पक्षात झालेले मतभेद समजू शकतो. अशा पद्धतीने जर आम्ही रामटेक व कोल्हापूरची विद्यमान जागा त्यांना दिली तर त्या बदल्यात आम्ही दोन जागा घेतल्या आहे. आम्ही सांगलीची जागा लढणार आहोत. मी मान्य करतो सांगलीमध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. पण आमचंही वर्चस्व आहे. तसचं कोल्हापूरमध्येसुद्धा आहे.
महाविकास आघाडीची आज बैठक -संजय राऊत म्हणाले की, " आज साडेचार वाजता महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांची महत्त्वाची बैठक आहे. किमान समान कार्यक्रमाबाबत आज बैठक आहे. जागा वाटपाचा विषय आमच्यासाठी आता संपलेला आहे. देशात सात टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्याबाबत रणनीती ठरवण्यासाठी बैठक होणार आहे. कुठल्या विभागामध्ये कुणी प्रचार करायला पाहिजे? प्रचार साहित्य कशा पद्धतीचं असायला पाहिजे, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकरांबाबत अद्यापही सकारात्मक-प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं बुधवारी ८ उमेदवारांची घोषणा केली. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी ८ जागा घोषित केलेल्या आहेत. राज्यात निवडणूक पाच टप्प्यात होणार आहे. अजून बरीच संधी आहे. तसेच देशात असलेल्या दळभद्री सरकारचं हुकूमशाही पद्धतीने शोषण चालू आहे. भ्रष्टाचार सुरू असून संविधानाची हत्या होत आहे. त्याच्या रक्षणासाठी सुरू असलेली लढाई बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. संविधान रक्षणाची सर्वात जास्त महत्त्वाची जबाबदारी आंबेडकर यांची आहे. भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल, अशा पद्धतीचं कुठलंही पाऊल बाळासाहेब आंबेडकर उचलणार नाहीत. निवडणुका येतात, राजकारण होत असतं. पण संविधानच राहिलं नाही तर काय परिस्थिती होईल? म्हणून आंबेडकर व आमच्या सर्वांचे विचार एक आहेत. ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी एकप्रकारे अद्यापही वंचितशी हातमिळवणी करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचा-
- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू; राज्यातील 'या' मतदारसंघांचा समावेश; पहिल्या टप्प्यात 5 जागांसाठी 'इतके' अर्ज - Lok Sabha Elections 2024
- भाजपाकडून खासदार दिनेश शर्मा यांची महाराष्ट्राच्या प्रभारी पदी नियुक्ती, जाणून घ्या त्यांची राजकीय कारकीर्द - lok sabha election 2024