महाराष्ट्र

maharashtra

मनोज जरांगे पाटलांनी जालन्यातून लोकसभा लढवावी; प्रकाश आंबेडकरांचं आवाहन

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 4:30 PM IST

Prakash Ambedkar on Manoj Jarange Patil : जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटलांनी निवडणूक लढवावी, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी केलंय.

प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर

मुंबई Prakash Ambedkar on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी आता उपोषण सोडावं आणि जालना येथील लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, त्यांनी कोणत्याही पक्षाचा आधार न घेता निवडणूक लढवावी, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केलंय.

लोकसभा निवडणूक लढवावी : मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलंय. मात्र, आता त्यांनी स्वतःच्या शरीराचा त्याग करुन घेण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणाच्या माध्यमातून जी जनजागृती करायची होती ती झालेली आहे. आता आरक्षण मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत, जरांगे पाटील यांनी आता कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना मधून लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी. कोणत्याही पक्षाच्या आधारानं जर त्यांनी निवडणूक लढवली, तर त्या पक्षाची बंधनं त्यांच्यावर येतील आणि बंधनं असली की गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येणार नाहीत. त्यामुळं त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी."

मराठा आणि ओबीसींचं ताट वेगळं हवं : आरक्षणाच्या संदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले की, "गरीब मराठ्यांचं आणि ओबीसींचं ताट हे वेगळंच हवं. ओबीसींच्या ताटात मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. तसं झालं तर टिकणारं आरक्षण मिळणार नाही. म्हणून गरीब मराठ्यांचं ताट आणि ओबीसींचं ताट वेगळं असावं अशी आमची ठाम भूमिका आहे. ओबीसी समाजात सध्या राजकीय जागृती झाली. यासंदर्भात आपल्याला आनंद आहे. ही लोकशाहीची सुरुवात झाली असं आता आपण मानतो. आपल्या अधिकाऱ्यांची लढाई आपणच लढावी. भाजपाची धार्मिक विचारधारा आता गळून पडत आहे." अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याबाबत विचारलं असता ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, चव्हाण यांनी का भाजपा प्रवेश केला? याचं उत्तर काँग्रेस पक्ष देऊ शकेल. अन्य कोणी या प्रश्नावर उत्तर देईल, असं आपल्याला वाटत नसल्याचं ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. मराठा आरक्षण आंदोलन; सकल मराठा समाजाच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक, जालन्यात टायर जाळले
  2. वडेट्टीवार अन् भुजबळ शेपूट नसलेले नेते; मनोज जरांगे पाटलांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details