महाराष्ट्र

maharashtra

प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात काँग्रेसचे डॉ. अभय पाटील लढणार, राज्यात वंचितचा कुणाला बसणार फटका ? - lok sabha election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 7:21 AM IST

Updated : Apr 2, 2024, 8:03 AM IST

महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसने अकोला येथे उमेदवार दिलेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार हा अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात निवडणूक लढणार आहे. मात्र, वंचितनं राज्यभरात उमेदवार दिल्यानं मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्याचा राज्यातील लोकसभा निवडणुकीत कुणाला फटका बसणार? कोणाला फायदा होणार? जाणून घेऊ.

Akola Lok Sabha election
प्रकाश आंबेडकर विरुद्ध डॉ. अभय पाटील

मुंबई: राज्यात लोकसभा निवडणुकीचा ज्वर चांगला वाढला आहे. एकीकडे प्रचाराला सुरुवात झाली असताना दुसरीकडे अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही. तर वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वबळाचा नारा दिला. वंचितनं पहिल्या यादीत आठ जणांची आणि दुसरी यादीत 11 जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्यामुळे मतांचे वर्गीकरण होण्याची शक्यता आहे. वंचितचा फटका महाविकास आघाडीला बसणार? की महायुतीला बसणार? याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

वंचितचा प्रभाव कुठे?2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही जागांवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना दोन ते तीन क्रमांकाची मतं मिळाली होती. तर राज्यात आताही काही मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाची मतं प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला मिळू शकतात, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. वंचित स्वबळावर लढणार असल्यामुळे त्याचा फटका महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला अधिक बसणार असल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. राज्यातील विविध भागात वंचितला मागील निवडणुकीत चांगली मतं मिळाली होती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र येथील काही जागांवर आपण नक्की निवडून येणार, असा वंचितला आशावाद आहे. वंचितचा प्रभाव अकोला, सोलापूर, बुलडाणा, गडचिरोली, हातकणंगले, हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी आणि सांगली येथे आहे. मागील निवडणुकीत या मतदारसंघात वंचितला लाखांहून अधिक मत मिळाली होती. तर सांगलीत वंचितच्या उमेदवाराला 2 लाख 50 हजारांहून अधिक मतं मिळाली होती.

वंचित स्वतंत्र लढविल्यानं काय होणार परिणाम?
वंचित भाजपाची 'बी टीम'? वंचितचा इतिहास पाहता वंचितची 2019 मध्ये एमआयएमबरोबर पहिल्यांदा आघाडी केली. मात्र कालांतराने एमआयएमसोबतची आघाडी वंचितने तोडली. यानंतर दीड वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत वंचितची युती झाली. परंतु ही युती ही फार काळ टिकली नाही. वंचितने वेगळी भूमिका घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वंचित भाजपाची 'बी' टीम असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. याला उत्तर देताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरम्हणालेत की, आम्ही भाजपाची बी टीम आहोत की आणखी कोणी... हे योग्य वेळी नाना पटोले यांना सांगेन, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
मागील निवडणुकीत वंचितची कशी होती कामगिरी


वंचितचा फटका महाविकास आघाडीलाच-2019 साली वंचितच्या ज्या उमेदवारांना दोन नंबरची मतं मिळाली होती. त्या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराला मिळणारी मते वंचितकडे वळली आहेत. परिणामी वंचितचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे मागासवर्गीय आणि मुस्लिम यांची मते वंचितला मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला मिळणारी मतेही वंचितला मिळण्याची शक्यता आहे. परिणामी वंचितचा फटका महायुतीपेक्षा महाविकास आघाडीलाच किंवा मुख्यतः काँग्रेसलाच बसणार आहे, असं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलं आहे. तसेच मोदींच्या हुकूमशाहीला रोखण्यासाठी आणि संविधान वाचविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं सतत प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत. मात्र आता त्यांनी वेगळी भूमिका घेत स्वबळावर नारा दिला. त्यामुळं मतांचे वर्गीकरण होऊन याचा फायदा महायुतीलाच होणार, असंही राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलं आहे. वंचितचा फटका महाविकास आघाडीला बसणार की महायुतीला बसणार, हे येत्या 4 जूनला समजणार आहे.

हेही वाचा-

  1. "संजय राऊतांमुळंच आघाडीत बिघाडी"; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप - prakash ambedkar
  2. 'वंचित'चा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न! पुण्यातून वसंत मोरे उमेदवार? प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट - Third Alliance in Maharashtra
Last Updated :Apr 2, 2024, 8:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details