महाराष्ट्र

maharashtra

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्याला भीषण वादळाचा तडाखा; 5 जणांचा मृत्यू - Bengal Thunderstorm

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 9:41 AM IST

Bengal Thunderstorm : पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात रविवारी दुपारी भीषण वादळ आले. यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रविवारी रात्रीच घटनास्थळाचा आढावा घेण्यासाठी पोहोचल्या. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्याला भीषण वादळाचा तडाखा; 5 जणांचा मृत्यू
पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्याला भीषण वादळाचा तडाखा; 5 जणांचा मृत्यू

जलपाईगुडी Bengal Thunderstorm : पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात रविवारी एका भीषण वादळाचा तडाखा बसला. त्यामुळं या परिसरात मोठी नासधूस झाली. जिल्ह्याच्या बहुतांश भागात गारपिटीसह सोसाट्याच्या वाऱ्यामुळं अनेक झोपड्या व घरांचं नुकसान झालं. झाडंही उन्मळून पडली. विजेचे खांब पडले. या वादळामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय. तर 170 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिली भेट : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानीवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करुन रविवारी रात्रीच जलपाईगुडीला भेट दिली. त्यांनी या परिसराचा आढावा घेतला. चक्रीवादळामुळं प्रभावित झालेल्या लोकांना भेटण्यासाठी जलपाईगुडी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटललाही भेट दिली.

वादळामुळं होणारा विध्वंस : रविवारी पश्चिम बंगालला धडकलेल्या चक्रीवादळानं मोठा विध्वंस केला. दुपारी साडेतीनच्या सुमारास हे वादळ आलं. हे वादळ सुमारे 10 मिनिटं चाललं. यात अनेक झाडं उन्मळून पडली. नागरिकांच्या घरांचंही नुकसान झालं. यापूर्वी जलपाईगुडीच्या जिल्हा दंडाधिकारी शमा परवीन यांनी आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. तर आता वादळामुळं आणखी एका महिलेचाही मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलंय.

मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त : माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "आपत्ती आल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं. पाच लोकांचा मृत्यू झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जातंय. पीडितांना मदत करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रशासन गरजू लोकांच्या पाठीशी उभं राहील. जे नुकसान झालं त्याची आम्हाला जाणीव आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त : तत्पूर्वी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जलपायगुडी जिल्ह्यात वादळामुळं झालेल्या विध्वंसाबद्दल शोक व्यक्त केलाय. सोशल मीडियावर पोस्ट करताना मोदींनी लिहिलं की, "पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी-मैनागुरी भागात वादळामुळं प्रभावित झालेल्या लोकांसोबत माझ्या संवेदना आहेत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल शोक आहे. मी बंगाल भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना बाधित लोकांना मदत करण्याचं आवाहन करेल."

हेही वाचा :

  1. सुट्टीच्या काळात मुलांवर ठेवा लक्ष! फिरायला गेलेल्या दोन शाळकरी मुलींचा धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू - SATARA DROWN NEWs
  2. दक्षिण आफ्रिकेत इस्टर कॉन्फरन्ससाठी बसचा भीषण अपघात; बसमधील 45 जणांचा मृत्यू - South Africa Accident

ABOUT THE AUTHOR

...view details