नवी दिल्ली Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या 110 व्या एपिसोडमधून देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी ड्रोन दीदी, सोशल मीडिया आणि विकासकामांसह चंद्रपुराच्या टायगर रिजर्व्हर तसंच मेळघाटाचाही उल्लेख केलाय.
'मन की बात'मध्ये मेळघाटाचा उल्लेख :आपल्या 'मन की बात' कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मेळघाटचा उल्लेख केलाय. "आम्ही हजारो वर्षांपासून निसर्ग आणि वन्यजीवांसोबत सहअस्तित्वाच्या भावनेनं जगत आहोत. याचा अनुभव तुम्ही स्वतः घेऊ शकाल. तुम्ही कधी महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात गेलात तर तुम्हाला हे दिसेल. या व्याघ्र प्रकल्पाजवळील खटकाळी गावात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबातील लोकांनी सरकारच्या मदतीनं त्यांच्या घरांचे 'होमस्टे'मध्ये रुपांतर केलंय," असं म्हणत मोदींनी कौतुक केलंय.
चंद्रपुरात वाघांच्या संख्येत वाढ : चंद्रपूर टायगर रिजर्व्हरबाबत बोलताना मोदी म्हणाले, "सरकारच्या प्रयत्नांमुळं देशात वाघांची संख्या वाढलीय. महाराष्ट्रातील चंद्रपूर टायगर रिजर्व्हरमध्ये वाघांची संख्या 250 हून अधिक झालीय. चंद्रपूर जिल्ह्यातील मानव आणि वाघ यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (AI) मदत घेतली जातेय. तिथं गाव आणि जंगलाच्या सीमेवर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जेव्हा जेव्हा वाघ गावाच्या हद्दीत येतो, तेव्हा लोकांना 'एआय'च्या मदतीनं अलर्ट मिळतो. या प्रणालीमुळं 13 गावांतील लोकांना मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. वाघांनाही संरक्षण मिळालेंय."
पुढील तीन महिने प्रसारित होणार नाही 'मन की बात' :"देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. त्यामुळं गेल्यावेळेप्रमाणेच मार्च महिन्यातही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मागील 110 एपिसोड आम्ही चांगल्या पद्धतीनं सादर केले. हा सरकारी कार्यक्रम नाही हे 'मन की बात'चं मोठं यश आहे. 'मन की बात'मध्ये देशाच्या सामूहिक शक्तीबद्दल, देशाच्या कामगिरीबद्दल बोललं जातं. एकप्रकारे हा जनतेनं, जनतेसाठी, जनतेकडून तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र, तरीही राजकीय शिष्टाईचं पालन करुन लोकसभा निवडणुकीदरम्यान 'मन की बात' पुढील 3 महिने प्रसारित होणार नाही. आता जेव्हा आम्ही तुमच्याशी 'मन की बात' मध्ये संवाद साधू, तेव्हा तो 'मन की बात'चा 111 वा भाग असेन. पुढच्या वेळी 'मन की बात' हा 111 या शुभ अंकानं सुरू झाल्यास काही चांगलं होईल", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
हेही वाचा :
- पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'सुदर्शन सेतू'चं उद्घाटन; देशातील सर्वात लांब 'केबल ब्रिज'