महाराष्ट्र

maharashtra

"मिशन पूर्ण करुनच अंतिम श्वास सोडेन": इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ 'असं' का म्हणाले?

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 10:00 PM IST

ISRO Chief S Somanath Cancer : इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या आरोग्याबाबत बातमी समोर आली आहे. एस. सोमनाथ यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. याबद्दल स्वत: सोमनाथ यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, ऑपरेशन आणि केमोथेरपी झाली असून सध्या तब्येत व्यवस्थित असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ

नवी दिल्ली ISRO Chief S Somanath Cancer : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एस. सोमनाथ यांना कॅन्सर आजाराचं निदान झालं होतं. या आजाराचं निदान झाल्याची स्वत: सोमनाथ यांनी माहिती दिली आहे. एका मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी मिशन आदित्य एल-1 चं प्रक्षेपण झालं, त्याच दिवशी ही दु:खद बातमी एस सोमनाथ यांना समजली होती. त्यानंतर सोमनाथ यांनी ही बातमी घरच्यांना सांगितली, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. परंतु, या गोष्टीचं कसलंही नैराश्य चेहऱ्यावर न दाखवता सोमनाथ यांनी आपलं आदित्य एल -1 हे मिशन पूर्ण केलं होतं.

असा काही गंभीर आजार असेल याची कल्पना नव्हती : आदित्य एल-1 चं प्रक्षेपण 2 सप्टेंबर 2023 रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून झालं होतं. आता जवळपास सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. आता सोमनाथ यांनी याबद्दल माहिती दिली. चांद्रयान-3 वेळी त्यांना त्रास जाणवला होता. मात्र, त्यांना असा काही गंभीर आजार असेल याची पुसटशीही कल्पना त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला नव्हती. परंतु, दुर्दैवाने या आजाराचं निदान त्यांना झालं होतं.

'ही लढाई मी लढणार आहे' : कॅन्सर आजाराचं निदान झाल्यानंतर सोमनाथ यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बराच काळ त्यांच्यावर केमोथेरेपी करण्यात आली. मात्र, आता त्यांचा आजार बरा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कॅन्सरशी झुंज देत असताना कुटुंबियांनी आणि सहकाऱ्यांनी साथ दिली असल्याचंही सोमनाथ यांनी सांगितलं. तसंच, सोमनाथ यांनी पुढं सांगितलं की, "उपचारासाठी मोठा वेळ लागणार आहे. ही एक मोठी प्रक्रिया आहे. परंतु, ही लढाई मी लढणार आहे. मी चारच दिवस रुग्णालयात होतो आणि आता या आजारातून खूप चांगला रिकव्हर झालो आहे."

सर्व मिशन पूर्ण करूनच मी अंतिम श्वास सोडेन : सोमनाथ पुढे बोलताना म्हणाले, "मी माझे काम सुरू केलं. कोणत्याही प्रकारचा त्रास न होता मी पाचव्या दिवशी काम सूरू केलं. सध्या मी सतत वैद्यकीय चाचण्या आणि स्कॅन करत आहे. त्यामुळे मला पूर्णपणे बरं झाल्यासारखं वाटत आहे. माझं इस्रोचं मिशन आणि लाँचिंगवर पूर्ण लक्ष आहे. इस्रोचे सर्व मिशन पूर्ण करूनच मी अंतिम श्वास सोडेन."

ABOUT THE AUTHOR

...view details