महाराष्ट्र

maharashtra

सशस्त्र दलाच्या 80 जवानांना 'शौर्य पुरस्कार' जाहीर; राष्ट्रपतींची घोषणा

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2024, 7:54 PM IST

Updated : Jan 25, 2024, 11:03 PM IST

Gallantry Awards 2024 : 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दलाच्या 80 जवानांना शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Gallantry awards
Gallantry awards

नवी दिल्ली Gallantry Awards 2024 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सशस्त्र दलाच्या 80 जवानांना 'शौर्य पुरस्कार' जाहीर केले आहेत. यातील 12 जवानांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये सहा किर्ती चक्र पुरस्कारांचा समावेश असून, तीन जवानांना मरणोत्तर किर्ती चक्र पुरस्कार देण्यात येणार आहे. तसंच 16 जावानांना शौर्य चक्र पुरस्कारांनं सन्मानित करण्यात येणार आहे. यात दोन मरणोत्तर शौर्य पुरस्काराचा समावेश आहे. तर, 53 जणांना सेना पदकं जाहीर करण्यात आली आहेत. त्यातील सात जवानांना मरणोत्तर सेना पदक देण्यात येणार आहेत. यात एक नौसेना पदक (शौर्य) तसंच चार वायू सेना पदकांचा (शौर्य) समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केलंय. यावेळी बोलताना त्यांनी राम मंदिराचा उल्लेख देखील केलाय. तसंच त्यांनी कर्पुरी ठाकूर यांना आदरांजली वाहिली. संबोधन करताना राष्ट्रपतींनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. 75 वा प्रजासत्ताक दिन हा ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. हा एक युगप्रवर्तक काळ आहे. आपली मूलभूत तत्त्वं आठवण्याचा आजचा हा योग्य क्षण आहे, असं मुर्मू यांनी म्हटलं आहे.

जगातील सर्वात मोठं कुटुंब : 140 कोटी भारतीय एक कुटुंब म्हणून देशात राहत आहेत. आपल्या प्रजासत्ताकाच्या मूळ भावनेशी देश एकरूप आहे. हे जगातील सर्वात मोठं कुटुंब असून, सहअस्तित्वाची भावना, सामूहिक उत्साह असल्याचंही राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या. राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण पाहिली आहे. भविष्यात या घटनेकडं व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं जाईल, अशी भावना राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील ६२ पोलिसांना पोलीस पदक :प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारनं उत्कृष्ट आणि प्रशंसनीय सेवा दिल्याबद्दल देशभरातील 1038 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस पदक देऊन गौरविले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील ६२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील या 62 पोलीस जवानांपैकी 18 जणांना शौर्य पदक, 4 जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि 40 जणांना गुणवंत सेवेसाठी पोलीस पदक प्रदान करण्यात येणार आहे.

हे वाचलंत का :

  1. मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस; 'मुंबईतील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता'
  2. आघाडीत बिघाडी, इंडिया आघाडी टिकवण्याचं नेत्यांपुढे आव्हान
  3. मराठा समाज आक्रमक; उपमुख्यमंत्री अजित पवारांना दाखवले काळे झेंडे
Last Updated : Jan 25, 2024, 11:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details