महाराष्ट्र

maharashtra

Shirdi Saibaba death anniversary : साईबाबांच्या पुण्यतिथीचा आज मुख्य दिवस; भाविकांनी शिर्डीत केली अमाप गर्दी....

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 1:11 PM IST

साईबाबांच्या पुण्यतिथीचा आज मुख्य दिवस

शिर्डी :साईबाबांच्या चार दिवसांच्या पुण्यतिथी उत्सवाचा आज मुख्य दिवस असल्यानं भाविकांनी साईबाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय. साईबाबांच्या पहाटेच्या काकड आरतीनंतर द्वारकामाईत कालपासून सुरू झालेल्या अखंड संतचरित्र पारायणाची आज सांगता झाल्यानंतर साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवसाची मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झालीय. द्वारकामाईत अखंड पारायण समाप्तीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी विणा, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी प्रतिमा घेऊन सवाद्य मिरवणूक पार पडली. मिरवणुकीनंतर संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपुजा करण्यात आली आणि पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवसाची सुरूवात झालीय. शिर्डीत सन्यस्थ जीवन जगत साईबाबांनी सर्व धर्म समभावाची शिकवण देत 15 ऑक्टोबर 1918 ला विजयादशमीच्या दिवशी आपला देह ठेवला. त्यानंतर दरवर्षी विजयादशमीला शिर्डीत साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो. यंदाचं हे पुण्यतिथी उत्सावचं 105 व वर्ष आहे. या पुण्यतिथी उत्सवाला तीन लाखाहून अधिक भाविक शिर्डीत येणार असल्यानं त्याच्या सुविधेसाठीच्या सर्व तयारी साई संस्थानने केल्या आहेत. मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍यावतीनं आकर्षक विद्युत रोषणाई व 'श्री राम मंदिर' हा भव्‍य देखावा साईबाबांच्या चारनंबर प्रवेशद्वारा जवळ उभारण्यात आलाय. तसंच हैदराबाद येथील दानशुर साईभक्‍त‍ रेणुका चौधरी यांच्‍या देणगीतून साईबाबा समाधी मंदिराला आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय.

ABOUT THE AUTHOR

...view details