हैदराबाद :मकर संक्रांतीचा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. यंदा 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आहे. तसेच 14 जानेवारीला भोगी आहे. संंक्रांंतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुंगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संंक्रांंतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते.
भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य : 1.कोवळे हरभरे, 2. वांगी, 3. शेवग्याच्या शेंगा, 4. वालाच्या कोवळ्या शेंगा, 5. हिरवे दाणे, 6. कच्ची केळी, 7. थोडे सुरण, 8. मटार, 9. थोडी मेथी, 10. बटाटा, 11. गाजर, 12. लाल मिर्ची, 13. तेल, 14. मीठ, 15. हळद, 16. गरम मसाला, 17. तीळ, 18. जिरे, 19. ओले नारळ, 20. कोथिंबीर, 21. गोडा मसाला, 22. दाण्याचा कुट.
हेही वाचा :मकर संक्रांतीला तिळाचे लाडू कडक होत असतील तर वापरा 'ही' अनोखी पद्धत
भोगीची भाजी बनवण्याची कृती : सर्वप्रथम कच्ची केळी उकडवून घ्या. बाकी भाज्या बारीक चिरून घ्या. आता एका कढईमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे घाला. त्यानंतर बारीक चिरलेल्या भाज्या भरपूर वाफवून घ्यायच्या. भाज्या थोड्या प्रमाणात मऊ होऊ द्या. कढईवर झाकण ठेवून त्यात पाणी ठेवायचे म्हणजे भाज्या करपणार नाहीत. 2-3 मिनिटानंतर भाजीवर थोडे पाणी घाला. ही भाजी नेहमी वाफेवरच शिजवून करावी चव आणि पौष्टिक गुणधर्म हे दोन्ही वाढतात. वाफेवर सर्व भाज्या शिजत आल्या की केळी टाकून परत एक वाफ काढायची.
हिवाळ्याच्या मोसमात नक्की खावी :त्यानंतर भाजीमध्ये लाल मिर्ची, मीठ, हळद, गोडा मसाला, गरम मसाला टाकावे. परत दोन मिनिटे भाजी झाकून शिजवून घ्यावी. नंतर त्यात भरपूर ओला नारळ गोडा मसाला घालून थोडेसे पाणी घालून भाजी सारखी करून घ्यायची. थोडे तीळकूट आणि दाण्याचा कुट पण आवडीप्रमाणे घालू शकता. भाजीमध्ये वरून कोथिंबीर घाला. लहानपणी नाक मुरडलेली ही भाजी आता भोगीच्या दिवशी आवडीने खाल्ली जाते. ही साधी आणि रुचकर भाजी हिवाळ्याच्या मोसमात नक्की खावी.
हेही वाचा :'या' कारणामुळे मकर संक्रांतीला घालतात काळे कपडे