महाराष्ट्र

maharashtra

संकटांनी हतबल झालेल्या शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरवला रोटावेटर

By

Published : Nov 8, 2020, 12:24 PM IST

पीक काढणीच्या वेळी राज्यात पावसाने धुमाकूळ घातला. पावसामुळे पिकांचा मोठ्या प्रमाणात नास झाला. यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश होतो. खराब झालेल्या पिकांची काढणी खर्च करण्याची देखील ताकद शेतकऱ्यांमध्ये राहिलेली नाही.

Soybean
सोयाबीन

यवतमाळ - नव्वद दिवसांचे नगदी पिक म्हणून शेतकरी सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र, यावर्षी आस्मानी संकटामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक मातीमोल झाले आहे. वारंवार येणाऱया संकटांना कंटाळून मारेगाव तालुक्यातील एका शेतकऱयाने आपल्या तीन एकर सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवले आहे. मारोती गौरकार असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

काढणीचा खर्चही निघेना -

यावर्षी सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कपाशी सोबतच सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. मात्र, सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरण्याच्यावेळी अतिवृष्टी आणि हवामानातील बदलामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काठी ठिकाणी तग धरून राहिलेले सोयाबीन पावसामुळे भिजल्याने ते काढण्यायोग्य राहिले नाही. अशा सोयाबीनची काढणी देखील परवडणारी नाही. मारोती गौरकार यांच्या तीन एकर सोयाबीनचीही अशीच अवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांनी शेतात रोटावेटर फिरवला.

हेही वाचा -संकटांना कंटाळून दहा एकर सोयाबीनवर शेतकऱ्याने फिरवले रोटावेटर

कपाशी पिकाचीही अशीच स्थिती -

मारेगाव तालुक्यात सोयाबीन प्रमाणेच कपाशी पिकावर बोंडअळीने कहर केला आहे. त्यामुळे कापूस उत्पादनालाही फटका बसला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णत: मेटाकुटीस आला आहे. शासनाने मारेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीरकरून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत.

'या' ठिकाणीही शेतकऱ्यांची अशीच स्थिती -

वाशिम, हिंगोली, अकोला या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची अवस्थाही अशीच आहे. पंधरवड्यापूर्वी वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १५ ते २० एकर सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details