महाराष्ट्र

maharashtra

'त्रिसूत्री पाळा दंड टाळा', कोरोना टाळण्यासाठी वर्धा प्रशासनाची धडक कारवाई; 4 लाखांचा दंड वसूल

By

Published : Jun 21, 2020, 9:28 PM IST

जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ करणे आणि सोशल डिस्टनसिंग पाळणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रकार वाढल्याने कारवाईची धडक मोहीम हाती राबवण्यात आली. यात आज 1 हजार 968 लोकांवर कारवाई करण्यात आली असून 3 लाख 94 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

त्रिसूत्री पाळा दंड टाळा
त्रिसूत्री पाळा दंड टाळा

वर्धा - कोरोना विषाणूच्या संसर्ग टाळता यावा म्हणून प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळेच राज्यात कोरोनाचा सर्वात कमी प्रादुर्भाव वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळतो. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. यात मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम राबविण्यात आली. आज रविवारी सकाळी 6 वाजतापासून ते सायंकाळपर्यंत 1 हजार 968 लोकांवर कारवाई केली असून 3 लाख 94 हजार रुपये दंड वसूल केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ करणे आणि सोशल डिस्टनसिंग पाळणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच्या अवलंब केल्यास कोरोनाचा संसर्ग थांबवू शकतो. लोकांनी स्वयंप्रेरणेने या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन प्रशासनाने वारंवार केले आहे. जिल्ह्यात सर्वत्र व्यवहार सुरू आहे. अशावेळी लोकांनी स्वतःहून नियमांचे पालन करावे असे अपेक्षित आहे. मात्र, नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रकार वाढल्याने कारवाईची धडक मोहीम हाती घ्यावी लागली.

यामध्ये एक सूत्र आणि धडक कारवाई असे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज आणि उद्या 22 जून रोजी जिल्हाधिकारी विवेक भीमानवार यांनी ठरवून दिल्यानुसार मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर प्रति व्यक्ती 200 रुपये दंडाची वसुली करण्यात येणार आहे. या मोहिमेला संपूर्ण जिल्ह्यात एकावेळी सुरुवात करण्यात आली. यामध्ये महसूल, पोलीस, नगरपालिका आणि ग्रामविकास विभागाने कारवाई केली. नगरपालिका आणि ग्रामीण भागात 11 तास राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण मास्क न वापरणाऱ्या 1 हजार 968 नागरिकांवर कारवाई करण्यात आली. यात 3 लाख 94 हजार 60 रुपये दंडही वसूल करण्यात आला.


विभाग - पथक - नागरिक - दंड
महसूल : 87 - 779 - 1,55,800
पोलीस : 19 - 484 - 96,800
नगरपालिका : 110 - 413 - 82,860
ग्रामविकास : 36 - 292 - 58,600
एकूण : 242 - 1968 - 3,94,060

मुख्य म्हणजे आज सुटीचा दिवस असतानाही महसूल, पोलीस, नगरपालिका ग्रामविकास या चार विभागांनी धडक मोहीम राबवून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले. मास्क नसणाऱ्या लोकांवर कारवाई केली. या मोहीमेत एकूण 310 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन ही कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details