महाराष्ट्र

maharashtra

१०० तोळे सोन्याची किंमत फक्त ३८ हजार, लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला दिला सुवर्णहार

By

Published : May 23, 2021, 3:16 PM IST

Updated : May 24, 2021, 4:50 PM IST

भिवंडीतील तालुक्यातील कोनगाव येथील एकाने लग्नाच्या वाढदिनी आपल्या पत्नीला शंभर तोळ्याचा सोन्याचा हार भेट दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलावून इतक्या महागड्या हारची सुरक्षा कशी करणार, अशी विचारणा केली. त्यावर तो हार नकली असल्याचे उत्तर त्या व्यक्तीने दिले.

छायाचित्र
छायाचित्र

ठाणे - सुखाने संसार चालावा म्हणून पती पत्नी एकमेकांच्या सुख दुःखात कायमच सोबतच असतात. त्यातच लग्नाचा प्रत्येक वाढदिवस आठवणीत राहावा म्हणून लग्नाच्या वाढदिवशी पती-पत्नी एकमेकांना भेटवस्तू देतात. अशीच एक भेटवस्तू म्हणून पत्नीला चक्क शंभर तोळे सोन्याचा हार पतीने भेट दिला. या भेटीने पत्नीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याच बरोबर हा हार भेट देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओत पती हार भेट देताना हिंदी चित्रापटाचे गाणं गातांनाही दिसत आहे. मात्र, व्हायरल व्हिडिओमधील लांबलचक सोन्याचा हार पाहून पोलिसही थक्क झाले. त्यांनतर भेटवस्तू देणाऱ्या पतीला पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलवल, त्यामुळे त्याची एकच धावपळ झाली होती. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात पतीने लग्नाच्या वाढदिवसाला आपल्या पत्नीला एवढा महागडी भेट दिल्याने सर्वत्र नेटकऱ्यांमध्ये या भेटवस्तूची चर्चा रंगताना दिसत आहे.

पोलीस निरीक्षक

'तो' सोन्याचा हार निघाला नकली

भिवंडीतील तालुक्यातील कोनगाव येथील रहिवासी असलेला बाळा कोळी यास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोनगाव पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून सोन्याच्या महागड्या हाराची सुरक्षा कशी कराल, एवढी महागडी वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा किंवा इतर अन्य ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. त्यावेळी बाळा कोळी यांनी हार नकली असल्याचे सांगितले. हार नकली असल्याचे समजताच पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला.

38 हजार रुपयाला खरेदी केला होता हार

बाळा कोळीने हा सोन्याच्या हारासारखा दिसणारा हार कल्याणच्या एका ज्वेलर्समधून खरेदी करून आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीला दिला होता. याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी त्या ज्वेलर्समध्ये जाऊन माहिती घेतली असता ज्वेलर्स मालकाने तो हार नकली असल्याचे सांगितले. तसेच 38 हजार रुपयांना हार खरेदी करण्यात आल्याचे ज्वेलर्स मालकाने सांगितल्यानंतर पोलिसांनाही खात्री पटली व तो हार नकली असल्याचेही निष्पन्न झाले.

सोन्याच्या अलंकारांचा गाजावाजा करू नये

अलंकाराचा गाजावाजा अशा प्रकारे केल्यास सोन्याच्या दागिन्यांची माहिती चोरट्यांना समजली तर त्यामुळे चोरी व दरोड्याच्या घटना घडण्याची शकता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारे कोणतीही बाब सोशल मीडियावर टाकून त्याचे प्रदर्शन करू नये, असे आवाहन कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी केले आहे.

Last Updated : May 24, 2021, 4:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details