महाराष्ट्र

maharashtra

Thane Rain Update: पुराच्या पाण्यात अडकलेल्या 'त्या' नागरिकांची बचाव पथकाने केली सुटका; शेकडो कुटूंबाचे स्थलांतर

By

Published : Jul 28, 2023, 12:14 PM IST

कल्याण पूर्व भागात ५० हून अधिक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांची अग्निशमन दलाच्या जवानांसह बचाव पथकाने बोटीच्या साहाय्याने रात्री पावणे अकरा वाजता सुटका केली आहे. तर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सखलभाग तसेच नदी, खाडी लगत राहणाऱ्या शेकडो कुटूंबांचे बचाव पथकाकडून स्थलांतर करण्यात आले आहे.

Thane Rain Update
नागरिकांची बचाव पथकाने केली सुटका

नागरिकांची बचाव पथकाने केली सुटका

ठाणे :हवामान विभागाने ठाणे जिल्ह्याला २७ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार गुरूवारी २४ तास मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे नदी, खाडी, तसेच शहरातील सखल भाग जलमय झाला होता. त्याचा सर्वाधिक फटका कल्याण पूर्वेतील चक्की नाका भागातील शंभर फुटी रस्त्यावर असलेल्या चेतना शाळेनजीकच्या सहा ते सात चाळींना बसला. अनेक कुटूंब राहत असलेल्या या चाळीत गुरूवारी रात्री पावणे अकरा वाजता पुराच्या पाण्याने विळखा घातला होता. त्यामुळे चाळीत राहणाऱ्या कुटूंबामध्ये भीती निर्माण झाली होती. तेथील नागरिक मदतीसाठी आरडाओरड करत होते. त्यानंतर स्थानिक समाजसेवक आणि काही तरुणांनी या चाळीत मदतीसाठी धाव घेतली होती.


शेकडो कुटूंबांचे स्थलांतर : काही वेळातच कल्याण पूर्व भागातील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'ड' आणि 'ह' या दोन प्रभागात असलेले अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांची बोटीच्या साहाय्याने सुटका करत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. यामध्ये ५० हून अधिक नागरिकांचा सामावेश होता. दरम्यान, कल्याणमधील वालधुनी नदीलगत असलेल्या अशोकनगर, सह अन्य वस्त्या तसेच खडेगोळववली, अडवली ढोकळी, आणि खाडी किनारी असलेल्या रेतीबंदर परिसरातील शेकडो कुटूंबांचे स्थलांतर करण्यात आले. आजही ठाणे जिल्ह्यात पावसाचा अलर्ट दिला आहे. त्यामुळे स्थलांतर झालेल्या नागरिकांच्या मनात घरातील साहित्याचे काय होईल? याची भीती वाटत असल्याचे दिसून आले.


रेल्वे मार्ग जलमय :दुसरीकडे कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवरील रेल्वे मार्गिकेवर मुसळधार पावसाचे पाणी साचले होते. रेल्वे मार्ग जलमय झाल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसकडून कर्जत, कसाराकडे जाणाऱ्या लोकल दिवा, डोंबिवली परिसरात थांबविण्यात आल्या. त्यामुळे ठाकुर्ली, डोंबिवली, दिवा रेल्वे स्थानकापर्यंत कल्याण दिशेने जाणाऱ्या लोकलच्या रांगा लागल्या होत्या. गुरुवारी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मुसळधार पाऊस पडत असल्याने डोंबिवली, कल्याण परिसर जलमय झाला. त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला. कामावरुन संध्याकाळी घरी परतणाऱ्या नोकरदारांना या जलमय परिस्थितीचा फटका बसला आहे.

हेही वाचा :

  1. Nanded Rain Update: नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, दोन तरुण गेले वाहून... काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
  2. Kolhapur Flood Update : कोल्हापूरसाठी पुढील 24 तास महत्त्वाचे; धरण क्षेत्रातील मुसळधार पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ
  3. Maharashtra monsoon Rain : मुंबई, ठाण्यात पावसाचा दिवसभर मुक्काम, आजही राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, जाणून घ्या कुठे आहे रेड अलर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details