माहिती देताना एसीपी सुनील कुराडे ठाणे Thane Crime News: जिल्ह्यात घरफोड्या करत धुमाकूळ घालणाऱ्या एका हायप्रोफाईल सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी (Manpada Police) उत्तर प्रदेशमधील आजमगड जिल्ह्यातून फिल्मी स्टाईलनं बेड्या ठोकल्या आहेत. हा चोरटा ठाणे, मुंबईत घरफोड्या करून मुळगावी मुद्देमाल घेऊन पसार होत होता. त्या पैश्यातून त्याने गावात आलिशान बंगला बांधून ३ ते ४ महागड्या कार खरेदी केल्या आहेत. त्यांची लक्झरी लाईफ पाहून पोलीसही चक्रावले आहेत. अनेक महिन्यांपासून हा चोरटा पोलिसांना चकवा देत होता. अखेर त्याला पकडण्यासाठी पोलिसांना दोन दिवस वेशांतर करुन, तो राहात असलेल्या गावातील वीटभट्टीवर काम करावे लागले. राजेश अरविंद राजभर असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे.
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती : डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद घरात जबरी चोरीचा गुन्हा घडला होता. या गुन्ह्यातील चोरट्यांचा शोध घेण्यासाठी डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सुनिल तारमळे, प्रशांत आंधळे, अविनाश वनवे यांच्या पथकानं तपास सुरू केला. घटनास्थळाच्या परिसरातून चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झालं होतं. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली की, सराईत चोरट्याचं नाव राजेश राजभर असून तो उत्तर प्रदेश राज्यातील आजमगड जिल्ह्यातील लालगंज तहसीलमध्ये कंजहीत रायपूर या गावात राहतो. राजेशच्या शोधात नवी मुंबई पोलीस (Navi Mumbai Police) आणि मीराभाईंदर क्राईम ब्रांचही लागले होते. मात्र त्यांना यश आलं नाही.
अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, डोंबिवली, शीळफाटा या परिसरातील गुन्हे उघडकीस आले आहे. या आधीही राजेश राजभरने मोठ्या प्रमाणात चोरी केली होती. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला राजेश राजभर हा अंबरनाथमध्ये राहायला होता. बंद घरांची तो घरफोडी करायचा. चोरी केल्यानंतर चोरीतून मिळालेले पैसे घेऊन तो उत्तर प्रदेशला पळून जात होता. राजेशने चोरीतून मिळालेल्या पैशांमधून आपल्या मूळ गावी अलिशान बंगला बांधला होता. तसेच महागड्या दुचाक्या देखील खरेदी केल्या आहेत. -सुनील कुराडे, एसीपी
असा सापडला आरोपी : मानपाडा पोलीस ठाण्याचे एक पथक त्याचं मूळ गाव असलेल्या कंजहित रायपूर गावात पोहचले. मात्र पोलिसांना माहिती मिळाली की, राजेश राजभर हा या गावात राहतो. परंतु त्यावेळी तो घरात नव्हता. मात्र त्याचा आलिशान बंगला त्या बंगल्यासमोर महागड्या कार उभ्या असल्याचे पाहून पोलीसही चक्रवाले होते. त्यानंतर दोन दिवस तीन पोलीस राजेशच्या शोधात होते. हे तिन्ही पोलीस दोन दिवस वीट भट्टीवर काम करत होते. त्यांची नजर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर होती. अखेर गावाच्या दिशेने दुचाकीवरून येताना चोरटा राजेश पोलिसांच्या सापळ्यात अडकला. दरम्यान, त्याच्या विरोधात आतापर्यंत २२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून २१ लाख २६ हजाराचे दागिने हस्तगत केले. तसेच या चोरट्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. तर पोलीस पुढील तपास करत आहे.
हेही वाचा -
- Thane Crime News : चोरीच्या पैशातून बारबालांवर उधळपट्टी, घरफोड्या करणारे दोन चोरटे अखेर जेरबंद
- Thane Crime: अट्टल गुन्हेगाराला अटक; १० घरफोड्या केल्याची कबुली
- Crorepati Thief : 'करोडपती' चोर! अलिशान कारमध्ये फिरतो, 1200 घरफोड्यांमध्ये आहे सहभाग