महाराष्ट्र

maharashtra

'आम्ही सरकारमध्ये असताना जी रेषा ओढली, त्यापेक्षा मोठी रेषा ओढा'

By

Published : Feb 20, 2020, 10:52 AM IST

Updated : Feb 20, 2020, 11:17 AM IST

मागील सरकारच्या कार्यकाळात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबविलेल्या सुमारे ४९ कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या चौकशीचे आदेश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. याविषयावरून सध्या वाद सुरू आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, मागील सरकारने जे केलेय ते सर्व वाईट दाखवायचे. हे योग्य नसून आम्ही सरकारमध्ये असताना जी मोठी रेषा मारली आहे, त्यापेक्षा मोठी रेषा या सरकारने ओढावी, असा सल्ला ठाकरे सरकारला दिला.

देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे

ठाणे - फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या ४९ कोटी वृक्षलागवडीवरून सध्या वादंग उठले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून या वृक्षलागवडीची चौकशी केली जाणार आहे. याबाबत, फडणवीस यांना विचारले असता, मुनगंटीवार यांनी प्रचंड प्रमाणात झाडे लावली असून त्याचे जीओ टॅगिंग झालेले आहे. सर्व कारभार पारदर्शी असून याला 'लिम्का बुक'नेही पुरस्कार दिला आहे. तरीही जुन्या सरकारने जे केले ते वाईट दाखवायचे. हे योग्य नसून आम्ही सरकारमध्ये असताना जी मोठी रेषा मारली, त्यापेक्षा मोठी रेषा या सरकारने ओढावी, असा सल्ला माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला.

ठाण्यातील छत्रपती शिवाजी मैदानात बुधवारी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे, ठाणे भाजप अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा -'झाडा'झडती..! वनमंत्र्यांनी दिले मुनगंटीवारांच्या चौकशीचे आदेश

शिवाजी महाराजांनी आपल्याला जी शिकवण दिली, त्यामार्गाने राज्यकारभार हाकला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन खऱ्या अर्थाने का करून दाखवले होते. विशेष म्हणजे, महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून सामान्यातील सामान्य माणसापर्यंत जागृती निर्माण केली. शिवरायांची शिकवण विसरला तर, महाराष्ट्र धर्म टिकणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, कार्यक्रमाच्या समारोपानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राज्यात महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, हा राजकारणाचा विषय नसून गंभीर विषय आहे. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर जरब बसायला हवी. छत्रपती शिवरायांनी महिला सुरक्षेला जसे प्राधान्य दिले, त्याच धर्तीवर या सरकारने कठोर कायदा केल्यास त्याला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे मत व्यक्त केले.

हेही वाचा -'33 कोटी वृक्ष लागवडीची वस्तुस्थिती समोर येणे गरजेचे, प्रकरणाची चौकशी करा'

वृक्ष लागवडीवरून उठलेल्या वादावर बोलताना फडणवीस यांनी, गेल्या पाच वर्षात सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड प्रमाणात वृक्ष लागवड झाली असून त्याचे 'जिओ टॅगिंग' झालेले आहे. वृक्ष लागवडीला 'लिम्का बुक'नेही पुरस्कार दिला असून त्याचे संपूर्ण दस्तावेज आहे. आमचा सर्व कारभार पारदर्शी आहे. केवळ जाणीवपूर्वक जुन्या सरकारने जे केले, ते वाईट दाखवायचा प्रयत्न होत आहे. त्यापेक्षा या सरकारला सल्ला आहे कि, आम्ही जी मोठी रेषा ओढलीय, त्यापेक्षा मोठी रेषा या सरकारने ओढण्याचा प्रयत्न करावा. उगाचच जनतेची दिशाभूल करून नये, असे म्हटले.

Last Updated :Feb 20, 2020, 11:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details