महाराष्ट्र

maharashtra

मेकॅनिकल इंजिनिअरची हत्या, चौघे आरोपी गजाआड

By

Published : Sep 16, 2021, 6:58 AM IST

Krishnamohan Tiwari
Krishnamohan Tiwari ()

काही दिवसांपूर्वी डोंबिवली-कल्याण रोडवरील खंबाळपाडा परिसरात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरचा अपघाती मृत्यू नव्हे, तर त्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार मानपाडा पोलिसांनी उघड केला आहे. कृष्णमोहन तिवारी असे हत्या झालेल्या मेकॅनिकल इंजिनिअरचे नाव आहे. याप्रकरणी चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ठाणे : काही दिवसांपूर्वी डोंबिवली-कल्याण रोडवर असलेल्या खंबाळपाडा परिसरात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरचा अपघाती मृत्यू नव्हे, तर त्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार मानपाडा पोलिसांनी उघड केला आहे. विशेष म्हणजे साक्षीदार किंवा इतर कोणतेही धागेदोरे नसतानाही मानपाडा पोलिसांनी या हत्येप्रकरणी ४ लुटारू मारेकऱ्यांना गजाआड करण्यात यश मिळविले आहे. रिहान बशीर शेख (रा. कचौरेगाव), सागर चंद्रमौली पोनाला (रा. चक्कीनाका), सुमित चितामण सोनवणे (रा. नांदीवली गाव) आणि एक अल्पवयीन मुलगा असे चौघे आरोपी आहेत. तर कृष्णमोहन तिवारी (४७) असे हत्या झालेल्या मेकॅनिकल इंजिनिअरचे नाव आहे.

कल्याणचे डीसीपी विवेक पानसरे

गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी दाखल

शनिवारी (11 सप्टेंबर) दुपारी 12 च्या सुमारास खंबाळपाडा परिसरात एक व्यक्ती जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत असल्याचे वाहतूक पोलीस बी. एस. होरे यांना आढळून आले. या व्यक्तीचा रुग्णालयात उपचार सुरू असतना दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला.

खोलात जाऊन हत्येचा उलगडा

डोंबिवलीचे एसीपी जय मोरे, व.पो.नि. दादा हरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पो.नि. बाळासाहेब पवार, स.पो.नि. अविनाश वनवे, अनिल भिसे, काटकर, कदम, चौधरी, यादव, घुगे, सोनवणे, भोसले, डी. एस. गडगे, किनरे, पवार, पाटील, कांदळकर, आर. जी. खिलारे, कोळी, मंझा या पथकाने खुनाचे गूढ उघडकीस आणण्यासाठी तपास सुरू केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत कॉल रेकॉर्डची माहिती मिळवली आणि आणखी खोलात तपास करत सीसीटीव्ही व तांत्रिक लोकेशनच्या आधारे हत्येचा उलगडा केला.

नोकरी देण्याच्या बहाण्याने बोलावून लूटमार करत हत्या

मृतक कृष्णकुमार हा मेकॅनिकल इंजिनिअर होता. त्याला पत्नी व दोन मुले आहेत. लॉकडाऊनच्या दोन महिन्यापूर्वी सौदी अरेबियातल्या कतारमध्ये नोकरी करत होता. मात्र, कोरोनामुळे त्याला पुन्हा भारत यावे लागल्याने त्याच्यावर नोकरी गमवण्याची वेळ आली होती. तेव्हापासून तो भारतात येऊन नोकरीच्या शोधात होता. त्यासाठी दिव्यातील एका प्लेसमेंट सेंटरकडे त्यानी नोकरी मिळावी म्हणून माहिती दिली होती. या प्लेसमेंट सेंटरमधील माहितीच्या आधारे आरोपी रिहान शेखने त्याला मोबाईलवर संपर्क केला आणि नोकरीसाठी त्याला कल्याण पूर्वेच्या कचोरे भागात भेटायला बोलावले. त्यानंतर रिहानने साथीदार सागर पोन्नालाच्या सहाय्याने आणि सुमित सोनावणे याच्या रिक्षात बसवत लूटमार करत त्याची हत्या केली. शिवाय, त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. अशी माहिती कल्याणचे डीसीपी विवेक पानसरे यांनी दिली.

आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

आरोपी रिहानने अशाप्रकारे आणखीही काही जणांना लुटले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगितले. आरोपी पैकी तिघांना कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना अधिक चौकशीसाठी 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा -मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता; पालघरमधील 12 गावांनी दिली मंजुरी

ABOUT THE AUTHOR

...view details