महाराष्ट्र

maharashtra

आई-दादा मला माफ करा...असे लिहून 'त्याने' संपवले आयुष्य

By

Published : Sep 4, 2020, 5:49 PM IST

आपल्या पतीचे घरातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा पत्नी संशय घेत होती. या कारणावरून ती सोडचिठ्ठी देण्याबाबत सचिनला त्रास देत होती. तसेच नातेवाईकांनीदेखील गावात मोठी बदनामी केली होती. या बदनामीला कंटाळून सचिन गावडे याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मृत व्यक्तीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सुनेसह अन्य तीन जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

असे लिहून 'त्याने' संपवले आयुष्य
असे लिहून 'त्याने' संपवले आयुष्य

सोलापूर : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सांगोला येथील व्यक्तीने आई - वडिलांना उद्देशून चिठ्ठी लिहून विषारी रसायन पिऊन आत्महत्या केल्याने सांगोला परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीने समाजात बदनामी केल्याने हे पाऊल उचलत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहीले आहे. सचिन बाळू गावडे (वय ३०, रा. वाकी घेरडी ता. सांगोला) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ही घटना २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास वाकी शिवणे येथील सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या पाठीमागे उघडकीस आली आहे. याबाबत गुरुवारी रात्री उशिरा सांगोला पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. पूनम सचिन गावडे, शत्रुघ्न दादासो लवटे, अलका शत्रुघ्न लवटे व निलाबाई रामचंद्र लवटे (सर्व रा.वाकी घेरडी, सांगोला, जि. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. या चौघा आरोपींविरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुरुवारी मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार हारुबाई बाळू गावडे (रा. वाकी घेरडी ता. सांगोला, जी सोलापूर) यांचा मुलगा सचिन याची पत्नी पुनम ही वारंवार सचिनचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा विनाकारण संशय घेत होती. यावरुन सचिनबरोबर भांडण काढून उलट-सुलट बोलून अपमानित करत होती. वारंवार सोडचिठ्ठी देण्याबाबत वाद करत मानसिक त्रास देत होती. अशी फिर्याद मृत सचिनच्या आईने सांगोला पोलीस ठाण्यात दिली आहे. तसेच त्यांचे नातेवाईक शत्रुघ्न लवटे, अलका लवटे व निलाबाई लवटे हेदेखील सचिनचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध आहेत. असे पूनमच्या मनात एकसारखे भरवून तिला फूस लावत होते. त्यांनी इतर नातेवाईकांमध्ये सचिन व महिलेच्या अनैतिक संबंधाबाबत बदनामी केली होती. याचा सचिनला मानसिक त्रास होत होता. या त्रासाला कंटाळून सचिनने वाकी शिवणे येथील साखर कारखान्याच्या पाठीमागील शिवारातील वनविभागाच्या फॉरेस्टमध्ये जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी सचिनने स्वतःच्या हस्ताक्षरात दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या आहेत. या चिठ्ठीत त्याने, आई-दादा मला माफ करा. आयुष्यात काही गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या, पण त्यात अपयश आले. आज जे मी काही करतोय त्यास माझी बायको पुनम ही जबाबदार असून तिने माझे आयुष्य पूर्णपणे खराब करून टाकले, असे लिहीले आहे. तसेच, शत्रुघ्न लवटे, अलका लवटे, निलाबाई लवटे हे सगळे यात सामील आहेत, असा उल्लेखही चिठ्ठीत केला आहे. सचिनच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पत्नी पूनम व इतरांबाबत हारुबाई गावडे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक घुले करत आहेत.

हेही वाचा -नोकरी लावतो, अशी थाप मारून फसवणूक करणाऱ्या बाप-लेकाला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details