महाराष्ट्र

maharashtra

लॉकडाऊनच्या विरोधात कामगारांचे आंदोलन, घराघरात फलक दाखवत सरकारचा निषेध

By

Published : Jul 18, 2020, 3:46 PM IST

सोलापुरात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचा निषेध करत सुमारे 10 हजार कामगारांनी घरातून आंदोलन केले.

solapur
solapur

सोलापूर- शहरात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या विरोधात कामगारांनी घरातूनच आंदोलन केले. सोलापूर शहरातील जवळपास 10 हजार कामगारांनी घरातूनच सरकारचा निषेध करत आंदोलन केले. सोलापूर शहरात सुरू करण्यात आलेले लॉकडाऊन मागे घ्या, असे फलक घेत 10 हजार घरांमध्ये आंदोलन करण्यात आले. माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 9 ऑगस्ट रोजी मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हे प्रभावी व एकमेव पर्याय किंवा उपाय असू शकत नाही. लोकांच्या आरोग्यासोबत रोजगार ही महत्वाचा आहे. दहा दिवस शहरातील व जिल्ह्यातील हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी कामगारांच्या बाबत सरकार किंवा प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना केलेली नाही. फक्त लॉकडाऊन जाहीर करून प्रशासन कडक अंमलबजावणी करत आहे. मात्र, ज्यांचे हातावर पोट आहे अशांचा कोणताही विचार सरकार व प्रशासनाकडून होत नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

सोलापुरातील जनतेच्या विरोध असतानाही सोलापुरात लागू केलेल्या लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी सोलापुरातील 10 हजार कामगारांच्या घरात आज आंदोलन करण्यात आले. जनतेच्या विरोध असताना जनतेवर लादलेल्या या बेकायदेशी लॉकडाऊनच्या निषेधार्थ लॉकडाऊन मागे घ्या, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ थांबवा, इंधनदरवाढ मागे घ्या, संपूर्ण लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करा, अशा मागण्या फलकांमार्फत केल्या आहेत. केंद्र सरकारकडून मोफत अन्नधान्य व दरमहा साडेसात हजार रुपये आर्थिक मदत द्या, भरमसाठ बिलाची आकारणी करणाऱ्या खासगी व सहकारी तत्वावर चालणाऱ्या दवाखानाच्या व्यवस्थापनावार कारवाई करा, राज्य सरकारकडून 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करा, अशा मागण्याचे फलक आणि राज्य सरकारच्या निषेधाचे फलक दाखवून निदर्शने करण्यात आली.

शनिवारी (दिनांक 18 जुलै) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या विरुद्ध ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सचिव अॅड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात आला. या बंद काळात कारखानदारांनी विडी, यंत्रमाग कामगारांना किमान दोन हजार रुपये मदत करावे, राज्य सरकारकडून 10 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी ही मागणी घेऊन 1 लाख श्रमिकांनी अर्ज दाखल केले याचा निर्णय घेऊन रोख अनुदान 9 ऑगस्टच्या आत घ्यावा. अन्यथा, तीव्र व आक्रमक आंदोलन सोलापुरात करण्यात येईल, असे माकपकडून सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details