महाराष्ट्र

maharashtra

Sindhudurg Crime : गणेश उत्सवावर शोककळा; तरुणाच्या खुनानं हादरले नागरिक

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 2:20 PM IST

Sindhudurg Crime : एकीकडं गणेश उत्सवाचा जल्लोष सुरू असून सिंधुदुर्ग जिल्हा मात्र तरुणाच्या खुनानं हादरला आहे. या तरुणावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आल्याचं उघड झालं आहे.

Sindhudurg Crime
घटनास्थळ

सिंधुदुर्ग Sindhudurg Crime : धारदार शस्त्रानं अज्ञात मारेकऱ्यांनी तरुणाचा खून केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना देवगड तालुक्यातील मुणगे मसवी रस्त्यावर घडली आहे. प्रसाद परशुराम लोके असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. प्रसाद लोके याचा खून ( Sindhudurg Crime ) झाल्याचं उघडकीस आल्यानं मिठबांव इथल्या गणेश उत्सवावर शोककळा पसरली आहे. प्रसाद लोकेचा खून करुन मारेकऱ्यांनी त्याच्याच गाडीत टाकून पलायन केल्याचं आज सकाळी उघडकीस आलं. यावेळी मारेकऱ्यांनी प्रसाद लोकेच्या गाडीची चावी आणि फोन घेऊन पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

चारचाकी गाडी भाड्यानं देण्याचा व्यवसाय :प्रसाद लोके हा मिठबांव इथं महा ई-सेवा केंद्र चालवत असून तो भाड्यानं चारचाकी देण्याचा व्यवसायही करत होता. रविवारी रात्रीच्या सुमारास प्रसाद लोकेला अज्ञात व्यक्तिचा फोन आला होता. यावेळी त्यांना सकाळी रुग्णाला घेऊन कुडाळ इथं न्यायचं असल्यानं तुझी गाडी घेऊन ये, असं सांगितलं होतं, अशी माहिती प्रसाद लोकेच्या निकटवर्तीयांनी दिली. प्रसाद लोके सोमवारी सकाळी उठून त्याच्या मालकीची वॅगनार कार घेवून भाडं नेण्यासाठी मसवी मार्गे गेला. मात्र आपण कोणाचं भाडं घेतलं आहे, त्याबद्दलची पूर्ण माहिती त्यानं घरात आई वडील व पत्नीला दिली नसल्यानं याबाबत उलगडा होऊ शकला नसल्याचं त्याच्या निकटवर्तीयानं सांगितलं.

सरपंचाला आला अपघात झाल्याचा फोन :मिठबावचे सरपंच भाई नरे यांना मसवी इथं वॅगनार गाडीचा अपघात झाल्याचा फोन आला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत गाडी घेऊन त्या ठिकाणी गेले. यावेळी मुणगे मसवी रस्त्यावर वॅगनार गाडीचा दरवाजा उघडलेल्या स्थितीत उभी असल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी गाडीचा नंबर पाहिल्यावर ही गाडी मिठबांव इथल्या तात्या लोके यांची असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. गाडीमध्ये त्यांनी पाहिलं असता, प्रसाद लोके हा रक्तबंबाळ अवस्थेत उलट्या स्थितीत पडलेला दिसला. त्याच्या डोक्यावर मागून धारदार शस्त्रानं वार केल्याचं दिसल्यानंतर सरपंच भाई नरे यांनी देवगड पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं.

प्रसाद लोकेवर धारदार शस्त्रानं वार :देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गाडीत उलट्या स्थितीत खून करुन टाकलेल्या प्रसाद लोके याचा मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आला. प्रसादच्या डोक्यावर, अंगावर धारदार शस्त्रानं वार करुन त्याचा निर्घृण खून केल्याचं निदर्शनास आलं. याबाबतची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम, पोलीस हवालदार राजन जाधव, प्रसाद आचरेकर, स्वप्नील भोवर, स्वप्नील ठोंबरे तसंच फॉरेन्सिक लॅबचे पथक व डॉग स्कॉडही दाखल झालं होतं.

प्रसाद लोकेच्या खुनानं देवगड हादरलं :मृत प्रसाद लोके हा विवाहित असून चार वर्षापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. घरी पत्नी व आई वडील यांच्यासमवेत तो राहत होता. त्याचे वडील परशुराम उर्फ तात्या लोके हे मिठबांव ग्रामपंचायत सदस्य असून प्रसाद हा मनमिळावू व शांत स्वभावाचा तरुण होता. त्याच्या निर्घृण हत्येनं मिठबांवसह देवगड तालुका हादरला असून त्याच्या हत्येमागचं नेमकं कारण समजू शकले नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी दिली.

हेही वाचा :

  1. Sindhudurg Sand Smugglers : वाळू माफीयांची वाढली मुजोरी; तहसिलदारांनाच केली धक्काबुक्की
  2. Sindhudurg Crime : आईसोबत फोनवर बोलण झाल्यानंतर तरूणाचा पैशांसाठी खून, नराधम आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details