महाराष्ट्र

maharashtra

नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा, भाजपाच्या ठरावाला शिवसेनेचा होकार

By

Published : Aug 1, 2020, 3:08 PM IST

देवगड पंचायत समितीच्या सभेत नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा, असा एकमुखी महत्वपूर्ण ठराव घेण्यात आला. विशेष म्हणजे या ठरावाला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला.

Shiv Sena approves BJP's resolution for nanar project in sindhudurag
नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा, भाजपच्या ठरावाला शिवसेनेचा होकार

सिंधुदुर्ग -देवगड पंचायत समितीच्या सभेत नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा, असा एकमुखी महत्वपूर्ण ठराव घेण्यात आला. विशेष म्हणजे या ठरावाला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला. देवगड पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभापती सुनिल पारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण उपस्थित होते.

कोरोना संकटकाळात लाखोंच्या संख्येने मुंबईतून लोक गावी आले असून, यातील युवावर्गाला सध्या रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे. मुंबई व इतर शहरातून गावी आलेल्या युवकांच्या रोजगारासाठी हा प्रकल्प व्हावा असा ठराव भाजप सदस्य अजित कांबळे यांनी मांडला. या ठरावाला सदस्य सदाशिव ओगले यांनी अनुमोदन दिले व सर्व सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दिला. यामध्ये शिवसेनेचे सदस्य तथा माजी उपसभापती संजय देवरूखकर यांनीही विरोध न दर्शवता पाठींबा दिला. नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा मोठा विरोध आहे, अशावेळी शिवसेना सदस्याने दिलेला पाठिंबा चर्चेचा विषय ठरला आहे.

तळवडे न्हावनकोंड धबधब्याच्या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या वाहनतळ व तेथील रूमचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. चुकीच्या पद्धतीने काम झाले आहे. वाहनतळाचे कामही अन्य ठिकाणी व्हावे अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. बापर्डे-जुवेश्वरवाडी विभाजनाचा ठराव सदाशिव ओगले यांनी मांडला. रामेश्वर अनपूर येथे १५ दिवस पाणी नाही, याकडे सदस्या शुभा कदम यांनी लक्ष वेधले. तांबळडेग येथील उधाणामुळे कोसळलेला मासळी सुकवण्याचा ओटा दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदाराकडून करून घ्यावे, अशा सूचना सभापती सुनिल पारकर यांनी पतन विभागाला दिल्या.

गणेशोत्सव काळात प्रत्येक गावात दिवसभरात एक एसटीची फेरी सुरू करावी, अशी मागणी सदस्या जयश्री आडीवरेकर यांनी केली. वाडा येथील डॉ.आंबेडकर चौकातील जुना पुल हटवण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ करावी, अशी मागणी पूर्वा तावडे यांनी केली.

यावेळी बोलताना भाजप सदस्य अजित कांबळे म्हणाले की, सध्या कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यावेळी मुंबईहून इथे आलेल्या बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून हा प्रकल्प झाला पाहिजे या भूमिकेतून आपण हा ठराव मांडल्याचे कांबळे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details