महाराष्ट्र

maharashtra

सिंधुदुर्गात बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई, 70 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त

By

Published : Mar 25, 2021, 9:36 PM IST

गोवा बनावटीची बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर जिल्हा पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई केली. याप्रकरणी पोलिासंनी दोघांना ताब्यात घेतले असून तब्बल 70 लाख 83 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ट्रक
ट्रक

सिंधुदुर्ग - गोवा बनावटीची बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर जिल्हा पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई केली. या कारवाईत तब्बल 65 लाख 82 हजार 960 रुपये किमतीची दारू आणि पाच लाखाचा ट्रक, असा एकूण 70 लाख 83 हजार 460 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी धुळे जिह्यातील चालक व मध्यप्रदेशातील क्लिनरवर अटकेची कारवाई करण्यात आली.

पुण्याला नेली जात होती दारू

बांदा पोलिसांनी चालक विठ्ठल लहानू बोरकर (वय 41, रा. धुळे) आणि राजू शूरसिंग सोळंकी (वय 24, रा. बडवानी-मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात ही दारू पुण्याला नेण्यात येत असल्याचे उघड झाले. या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात महसूल बुडवला जात असल्याचे समोर आले आहे.

बॅरलच्या आडून केली जात होती वाहतूक

इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू होती. गोव्यातून येणारा ट्रक (एमएच- 18 एए-0024) तपासणी करण्यासाठी पोलिसांनी थांबविला. चालकाने मागील हौद्यात पत्र्याचे रिकामी बॅरल असल्याचे सांगितले. तसेच त्याची वाहतूक पुण्याला करणार असल्याचे सांगितले. त्यासंबंधीचे बिलदेखील उपस्थित कर्मचाऱ्यांना दाखविले. मात्र, पोलिसांना संशय आल्याने ट्रकच्या हौद्याची तपासणी करण्यात आली. ट्रकच्या हौद्यात बाहेरून बॅरल ठेवण्यात आली होती. मात्र, आत पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारुच्या खोक्यांचा साठा करून वाहतूक करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले.

वायुवेग पथके तैनात करण्याची घोषणाच राहिली

दरम्यान, उत्पादन शुल्क आयुक्तांनी गोवा राज्यातून होणारी दारू वाहतूक रोखण्यासाठी सीमा भागात वायुवेग पथके तैनात करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता सहा महिने होत आले तरी कार्यवाही झालेली नाही. विभागातील गाड्या सीमा भागात फिरताना दिसतात. मात्र, दोन-तीन कारवाई सोडल्या तर काहीच प्रगती दिसत नाही.

हेही वाचा -'आमदार नितेश राणेंचा पराभव करून त्यांना शिवसेना काय आहे हे दाखवून देऊ'

ABOUT THE AUTHOR

...view details