महाराष्ट्र

maharashtra

प्रमोद जठार आडाळी प्रकल्पाविषयी लोकांमध्ये गैरसमज पसरवतात; आमदार वैभव नाईकांचा आरोप

By

Published : Oct 25, 2020, 6:00 PM IST

काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये 'औषधी वनस्पती संशोधन केंद्र' उभारण्यास मान्यता मिळाली होती. मात्र, विविध कारणांमुळे हा प्रकल्प रखडला. आता या प्रकल्पावरून स्थानिक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Vaibhav Naik
आमदार वैभव नाईक

सिंधुदुर्ग -'औषधी वनस्पती संशोधन केंद्र' हा प्रकल्प दोडामार्ग-आडाळी येथेच होणार आहे. त्याबाबतची मान्यताही मिळाली आहे. भाजपाचे नेते प्रमोद जठार यांनी विनाकारण लोकांमध्ये या प्रकल्पाविषयी गैरसमज पसरवू नये, असा सल्ला आमदार वैभव नाईक यांनी जठार यांना दिला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता, घोटगे-सोनवडे घाटाचा प्रश्न खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर मंत्री महोदयांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे सुटले. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गमध्ये 'औषधी वनस्पती संशोधन केंद्र'ही उभारल्या शिवाय गप्प बसणार नाही, असा ठाम विश्वास शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दोन वर्षांपूर्वी सिंधुदुर्गसाठी मंजूर झालेला औषधी वनस्पती संशोधन प्रकल्प भाजपाचे तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये नेण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळेच या प्रकल्पाला अडथळा निर्माण झाला होता. आता देखील हा प्रकल्प अन्यत्र हलवण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, हा प्रकल्प सिंधुदुर्गतच व्हावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी केली. त्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासोबत खासदार विनायक राऊत यांची बैठक झाली. यड्रावकरांनी सिंधुदुर्गमधील या प्रकल्पासाठी आवश्यक प्रस्ताव पाठण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

खासदार राऊत यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची सुध्दा भेट घेतली असून ते देखील सिंधुदुर्गमध्ये हा प्रकल्प करण्यासाठी सकारात्मक आहेत. येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाचा प्रस्ताव ठेवण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या प्रस्तावाला लवकरात लवकर मान्यता देतील. आडाळी येथे लवकरच औषधी वनस्पती संशोधन केंद्राचे काम प्रत्यक्षात सुरू होईल, असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details