महाराष्ट्र

maharashtra

शिवसेना प्रवेशावेळी बाळासाहेबांनी शंभूराजेंना आणली होती लाल दिव्याची गाडी, दिले होते राज्यमंत्री पद

By

Published : Jun 22, 2022, 7:20 PM IST

पाटणमध्ये 1997 मध्ये लोकनेते बाळासाहेब देसाईंचे नातू तथा विद्यमान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा झालेला शिवसेना पक्ष प्रवेश हा सर्वार्थाने आगळा होता. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शंभूराजेंच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला लाल दिव्याची गाडी घेऊन आले होते. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले सहकार परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी शंभूराज देसाईंना दिले होते.

Etv Bharat
Etv Bharat

सातारा -महाराष्ट्रात अनेक मातब्बरांचे पक्ष प्रवेश दिमाखात झाल्याचे आपण पाहिले असतील. परंतु, सातार्‍यातील पाटणमध्ये 1997 मध्ये लोकनेते बाळासाहेब देसाईंचे नातू तथा विद्यमान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा झालेला शिवसेना पक्ष प्रवेश हा सर्वार्थाने आगळा होता. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शंभूराजेंच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला लाल दिव्याची गाडी घेऊन आले होते. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले सहकार परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी शंभूराज देसाईंना दिले होते.

लोकनेत्यांचा नातू रूबाबात फिरला पाहिजे -पाटण तालुक्याचे सुपूत्र लोकनेते दिवंगत बाळसाहेब देसाई यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत राज्याच्या मंत्रीमंडळात विविध खात्याची मंत्रीपदे भूषविली होती. गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात ईबीसी सवलत त्यांनी लागू केली होती. लोकाभिमुख निर्णयामुळे बाळासाहेब देसाई लोकप्रिय ठरले होते. यामुळे शिवसेनाप्रमुख आणि लोकनेत्यांची खास मैत्री होती. मित्राचा नातू शिवसेनेत प्रवेश करतोय, म्हणून २० नोव्हेंबर १९९७ रोजी मरळी (ता. पाटण) येथील शंभूराज देसाईंच्या पक्ष प्रवेशासाठी स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आले होते. तसेच कार्यक्रमाला येताना ते लाल दिव्याची गाडी घेऊन आले होते. लोकनेत्यांचा नातू रूबाबात फिरला पाहिजे, म्हणून ही गाडी घेऊन आलो आहे, असे बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले होते.

पक्ष प्रवेशाबरोबर दिले मंत्रीपद -राज्यात १९९५ ला शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. तत्पूर्वी शंभूराज देसाई यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली होती. ते जिल्हा परिषद सदस्यही होते. तथापि, शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी ते विधानसभा निवडणुकीला एकदाही सामोरे गेलेले नव्हते. तरीही त्यांना शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेत दिमाखात प्रवेश दिला. शिवाय सहकार परिषदेचे मंत्रीपदही दिले. त्यामुळे शंभूराज देसाईंचा शिवसेना पक्ष प्रवेश हा राजकीय वर्तुळात गाजला होता.

शिवसेनाप्रमुखांना चांदीच्या तलवारीची भेट-पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात शंभूराज देसाई यांनी शिवसेनाप्रमुखांना चांदीची तलवार आणि तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशींना चांदीच्या गणपतीची मुर्ती भेट दिली होती. या प्रवेशानंतर शंभूराज देसाई हे १९९९ च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरले. त्यावेळी काँग्रेस दुभंगली होती आणि राष्ट्रवादीचा जन्म झाला होता. विक्रमसिंह पाटणकर यांना पाटणमधून राष्ट्रवादीने उमेेदवारी दिली होती. पाटणकरांनी शंभूराजेंचा पराभव केला. मात्र, 2004 च्या निवडणुकीत शंभूराज देसाईंनी पाटणकरांना पराभूत करून विधिमंडळात पहिल्यांदा प्रवेश केला. त्यानंतर २००९ ला शंभूराजेंचा पराभव झाला. मात्र, शंभूराज देसाईंनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत सलग विजय मिळविला.

आशिया खंडातील सर्वात तरूण चेअरमन -शंभूराज देसाई यांचे वडील शिवाजीराव देसाई यांचे निधन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची धुरा लहान वयात शंभूराज देसाईंच्या खांद्यावर आली. अशा परिस्थितीत सहकार अधिनियमानुसार वयाची पात्रता पूर्ण झाल्यानंतर १९८६ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी शंभूराज देसाई हे कारखान्याचे चेअरमन झाले होते. आशिया खंडात सहकार क्षेत्रातील सर्वात कमी वयाचे चेअरमन म्हणून त्यांची नोंद झाली होती.

हेही वाचा -CM Uddhav Thackeray Facebook Live : मुख्यमंत्री पदी राहायची माझी अजिबात इच्छा नाही - मुख्यमंत्र्यांचे बंडखोरांना भावनिक आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details