महाराष्ट्र

maharashtra

महाबळेश्वरजवळ गुराख्यांना 'ब्लॅक पँथर'चे दर्शन, पाहा व्हिडिओ

By

Published : Sep 20, 2021, 9:18 PM IST

black panthar

महाबळेश्वरच्या घनदाट, सदाहरित जंगलात कुमठे या गावाजवळ ब्लॅक पँथरने स्थानिक गुराख्यांना दर्शन दिले. सुमारे पाच मिनिटं हा बिबट्या दृष्टीस पडला. नंतर तो जंगलात निघून गेला.

सातारा - महाबळेश्वरच्या घनदाट, सदाहरित जंगलात कुमठे या गावाजवळ ब्लॅक पँथरने स्थानिक गुराख्यांना दर्शन दिले. सुमारे पाच मिनिटं हा बिबट्या दृष्टीस पडला. नंतर तो जंगलात निघून गेला. कुमठे गावच्या हद्दीत असलेल्या सुभाष नारायण जाधव यांच्या मालकीच्या शेतामध्ये रवींद्र जाधव व सुभाष जाधव हे दोन युवक गाई चारण्यासाठी घेऊन गेले होते. त्यांना तेथे काळा बिबट्या अर्थात ब्लॅक पँथर दिसला. ब्लॅक पँथरचा वावर हाच दिवसभर परिसरात चर्चेचा विषय झाला असून हे शेत गावापासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. वस्तीजवळ बिबट्या आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाबळेश्वरजवळ गुराख्यांना 'ब्लॅक पँथर'चे दर्शन
उपाययोजना करण्याची मागणी -
कुमठे हे गाव महाबळेश्वर कोयना खोऱ्यात अतिदुर्गम भागात वसले आहे. हा सर्व परिसर गर्द झाडी, जंगल यांनी व्यापलेला आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच जंगली प्राण्यांचा वावर असतो. मात्र दुर्मिळ ब्लॅक पँथर दिसल्याचा दावा स्थानिक युवकांनी केल्याने एकच खळबळ माजली आहे. साताऱ्याजवळ यापूर्वी काळा बिबट्या दिसला होता. खिंडवाडीजवळ रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळे काही वर्षांपूर्वी काळ्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. महाबळेश्वरच्या घटनेचा व्हिडिओ रविंद्र मनोहर जाधव यांनी अतिशय धाडसाने आपल्या मोबाईलद्वारे काढला. त्या व्हिडीओमध्ये ब्लॅक पँथर स्पष्ट दिसत असून वनखात्याने याबाबत तपास करून योग्य उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.


हे ही वाचा -अखेर राज कुंद्राला जामीन मंजूर, अडीच महिन्यानंतर घेणार मोकळा श्वास


काळा बिबट्या वेगळी जमात नाही -

साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी सांगितले कि, "काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसते. कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात. तर पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकणाच्या अभावामुळे असतो. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता, नेहमीचे ठिपके दिसतात. काळे बिबटे हे दाट जंगलांमध्ये जास्त असतात. तिथे त्यांना त्यांच्या रंगाचा फायदा होतो असे मानले जाते. काळा बिबट्या ही वेगळी जात नसल्यामुळे त्याच्या सवयी नेहमीच्या बिबट्यांप्रमाणेच असतात. बिबट्याच्या मादीला होणाऱ्या पिलांपैकी एखादे काळ्या रंगाचे असू शकते. वयाच्या दीड वर्षापर्यंत पिले स्वतंत्र शिकार करू लागतात. वन्यावस्थेत काळे बिबटे 11 वर्षांपर्यंत, तर प्राणीसंग्रहालयात 20 वर्षांपर्यंत जगत असल्याच्या नोंदी आहेत. बाकी सर्व सवयी बिबट्याच्याच आणि खाद्यही तेच असल्यामुळे रंग वगळता, काळा बिबट्या आणि नेहमीचा बिबट्या यांच्यात काहीही फरक नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details