महाराष्ट्र

maharashtra

Koyna Dam : कोयना धरणात उरला केवळ ६ टीएमसी पाणीसाठा; वीजनिर्मिती ठप्प होण्याच्या मार्गावर

By

Published : Jun 16, 2023, 10:53 PM IST

कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. सध्या धरणात ११.७४ टीएमसी (११.१५ टक्के) इतका पाणीसाठा आहे. यापैकी पाच टीएमसी पाणीसाठा हा मृत समजला जातो. त्यामुळे धरणात केवळ ६ टीएमसी पाणी शिल्लक आहे.

Etv Bharat  कोयना
Etv Bharat कोयना

सातारा - कोयना धरणातील पाणीसाठा तळाला गेला आहे. धरणात केवळ सहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वीजनिर्मिती ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. धरण व्यवस्थापनाला सिंचन आणि वीजनिर्मितीच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे लागत आहे.

केवळ ११ टक्के पाणी शिल्लक - कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे. सध्या धरणात ११.७४ टीएमसी (११.१५ टक्के) इतका पाणीसाठा आहे. यापैकी पाच टीएमसी पाणीसाठा हा मृत समजला जातो. त्यामुळे धरणात वास्तविक केवळ ६ टीएमसी इतकेच उपयुक्त पाणी शिल्लक आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू होईपर्यंत उपलब्ध पाण्यावरच सिंचन व वीजनिर्मितीची भिस्त आहे.

वीजनिर्मितीवर आल्या मर्यादा - सिंचनासाठी पूर्वेकडे केवळ धरण पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून १०५० क्यूसेक इतकेच पाणी सोडले जात आहे. पश्चिमेकडील वीजनिर्मिती प्रकल्पांसाठीही अत्यल्प पाणी सोडण्यात येत आहे. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे सध्या पूर्वेकडे सिंचनासाठी सोडावे लागणारे पाणी आणि पश्चिमेकडील जलविद्युत निर्मितीवर प्रचंड मर्यादा आल्या आहेत.


वीजनिर्मिती बंद पडण्याच्या मार्गावर -कोयना धरणात सध्या ११.७४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी ५ टीएमसी हा मृत साठा आहे. पाण्याची पातळी ६१९.४५५ मीटर आहे. ही पाणी पातळी ६१८ मीटरवर आल्यानंतर चौथ्या टप्प्याची वीजनिर्मिती ठप्प होते. पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठा खालावत चालला आहे. त्यामुळे सिंचन, पिण्याचे पाणी आणि वीजनिर्मितीवर प्रचंड मर्यादा आल्या आहेत.

पाणी उपशावर बंदी- कृष्णा नदीतून १४ ते १७ जून या दरम्यान पाणी उपसण्यास सांगली पाटबंधारे विभागाने बंदी घातली आहे. शनिवारी ही बंदी संपुष्टात येणार आहे. मात्र, पाऊस लांबल्याने कृष्णा नदीपात्र देखील कोरडे ठाक पडत चालले आहे. त्यामुळे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

तीव्र उन्हाळ्यामुळे यंदा उत्तर कर्नाटकात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. कोयना धरणातून ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकने यापूर्वीच केली होती. त्यानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच १ टीएमसी पाणी कर्नाटकला देण्यात आले आहे. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्र सरकारकडे पुन्हा तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत पाण्याचे दुर्भिक्ष कधी कमी होणार. त्यामुळे सर्वचजण पावसाची वाट पाहात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details